Join us

ओटीटीवर रिलीज झालेले 90 टक्के सिनेमे बेकार होते...! जॉन अब्राहमने उडवली नव्या ट्रेंडची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 14:35 IST

कोरोना काळात नुकसान टाळण्यासाठी अनेक मेकर्सनी ओटीटीवर धडाधड सिनेमे प्रदर्शित केलेत. पण जॉन अब्राहमला मात्र ओटीटी हा पर्यायच मान्य नाही.

ठळक मुद्देमुंबई सागा  हा चित्रपट येत्या 19 मार्चला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. संजय गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

कोरोना काळात चित्रपटगृहांना टाळे लागले आणि निर्माते-दिग्दर्शक ओटीटीकडे वळले. नुकसान टाळण्यासाठी अनेक मेकर्सनी ओटीटीवर धडाधड सिनेमे प्रदर्शित केलेत. पण जॉन अब्राहमला मात्र ओटीटी हा पर्यायच मान्य नाही. होय, काहीही झाले तरी मी ओटीटीच्या कुबड्या स्वीकारणार नाही, असे त्याने म्हटलेय. मी मोठ्या स्क्रिनचा अभिनेता आहे. सबस्क्रिप्शन फीजमध्ये तुम्ही मला खरेदी करु शकत नाही, असेही तो म्हणाला.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत जॉन अब्राहम बोलला आणि जे बोलला ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. जॉनचा ‘मुंबई सागा’हा सिनेमा उद्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होईल, असाच सर्वांचा अंदाज होता. पण जॉन यासाठी तयार नव्हता. माझा सिनेमा चित्रपटगृहातच प्रदर्शित होईल, यावर तो ठाम होता. याच संदर्भाने ओटीटीवर सिनेमा प्रदर्शित करण्याबद्दल जॉन बोलला.

‘ज्यांना सिनेमाबद्दल आत्मविश्वास नाही, तेच लोक आपला चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करतात, हे माझे प्रामाणिक मत आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणारे 90 टक्के सिनेमे बेकार होते. माझा सिनेमा खूप उत्कृष्ट आहे, असा दावा मी करणार नाही. पण तो अपयशी ठरला तरी मला चिंता नाही. किमान या महामारीला मी त्यासाठी जबाबदार नक्कीच जबाबदार ठरवणार नाही. 2019 मध्ये सिनेमांनी जसा बिझनेस केला, तसा बिझनेस सध्या शक्य नाही. पण म्हणून ओटीटीच्या कुबड्या मला मान्य नाहीत,’ असे जॉन यावेळी म्हणाला.  माझ्या 18 वर्षांच्या करिअरमध्ये मी अनेक मोठ्या बॅनर्ससोबत काम केले. तसेच कमी बजेटचे सिनेमेही केलेत. मल्टीस्टारर सिनेमेही स्वीकारलेत. मी जे काही कमावतो, त्यात समाधानी आहे. माझ्यासाठी पैसा हा फार मोठा विषय नाही. मी कामासाठी मोठ्या डायरेक्टरच्या दरवाज्याबाहेर उभा होऊ शकत नाही. हा अहंकार नाही तर आत्मसन्मनाचा विषय आहे, असेही जॉन म्हणाला.

मुंबई सागा  हा चित्रपट येत्या 19 मार्चला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. संजय गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :जॉन अब्राहम