The Royals: भारताला राजघराण्यांची मोठी परंपरा लाभली आहे. ही राजघराणी आज देखील तितकीच श्रीमंत आणि धनाढ्य आहेत. आजही काही भारतीय राजघराण्यांनी वारसा आणि लक्झरी यांनी भरलेली जीवनशैली स्वीकारली आहे. तर आता लवकरच एक भन्नाट आणि थोडी हटके अशी शाही प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेता ईशान खट्टर यांची मुख्य भूमिका असलेली 'द रॉयल्स' ही नवीन वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
या सिरीजमध्ये ईशान खट्टर याने एका राजघराण्याचा वारसदार अविराज सिंगची भुमिका साकारली आहे. तर दुसरीकडे भूमी पेडणेकर ही सोफिया शेखर या तरुण आणि हुशार उद्योजिकेच्या भूमिकेत आहे. दोन भिन्न जगांतील ही दोन माणसं एकमेकांच्या आयुष्यात येतात. सुरुवातीला या दोघांमध्ये वैचारिक मतभेद दिसून येतात, पण त्याच संघर्षातून एक सुंदर नातं उभं राहतं. या सिरीजमध्ये हलकेफुलके विनोद आणि रोमान्स यांचा सुरेख मेळ असणार आहे. येत्या ९ मे २०२५ रोजी ही सिरीज प्रदर्शित होईल.
ईशान आणि भूमीसोबत साक्षी तंवर, झीनत अमान, नोरा फतेही, दिनो मोरिया, मिलिंद सोमण, चंकी पांडे, अली खान यांसारखे अनेक दिग्गज कलाकार या सिरीजमध्ये झळकणार आहेत. या मालिकेची निर्मिती रांगिता आणि इशिता प्रितिश नंदी यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा प्रियंका घोष आणि नुपूर आस्थाना यांनी पेलली आहे.
सोशल मीडियावर या सिरीजच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. अनेकांनी या सिरीजला "भारतीय ब्रिजर्टन" असं नाव दिलं आहे. पारंपरिक राजेशाही पार्श्वभूमी आणि आधुनिक प्रेमकथेचा संगम पाहायला मिळणारी ही सिरजी तरुणांमध्ये लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे.