ईशा कोप्पिकर ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. हिंदीसोबतच ईशा काही साऊथ सिनेमांमध्येही झळकली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ईशाने साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. एका सिनेमात सीन शूट करताना नागार्जुन यांनी ईशाला चक्क १४ वेळा कानाखाली मारली होती. नेमकं काय घडलं होतं? ते जाणून घेऊया.
ईशाने चंद्रलेखा या सिनेमात नागार्जुन यांच्यासोबत काम केलं होतं. या शूटिंगदरम्यानचा किस्सा अभिनेत्रीने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. ती म्हणाली, "मला नागार्जुनने कानाखाली मारलं होतं. मला खराखुरा अभिनय करायचा होता. पण, जेव्हा त्यांनी माझ्या कानाखाली लगावली तेव्हा मला काहीच जाणवलं नाही. मी त्यांना म्हणाले की तुम्हाला मला खरंखरं कानाखाली मारायचं आहे. त्यांनी मला विचारलं की तुला चालेल का? कारण मी तर नाही मारू शकत. मी त्यांना म्हटलं की मला तो अनुभव हवाय. त्यानंतर त्यांनी पुन्हा माझ्या कानाखाली मारली पण तेदेखील अगदी हळू".
नागार्जुन यांनी कानाखाली मारल्यानंतरही ईशाच्या चेहऱ्यावर राग दिसत नव्हता. त्यामुळे तो सीन शूट होत नव्हता. या सीनसाठी ईशाला १४-१५ वेळा कानाखाली बसली. शूटिंग संपल्यानंतर ईशाचा गाल लाल झाला होता. ती म्हणाली, "माझ्या चेहऱ्यावर खरंच कानाखाली मारल्याचे निशाण दिसत होते. नागार्जुन यांनी त्यानंतर माझी माफी मागितल्याचंही ईशाने सांगितलं.