Join us

मला तिच्यासाठी पुन्हा जगायचय! ‘अंग्रेजी मीडियम’च्या रिलीजआधी इरफान खान झाला भावुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 11:52 IST

इरफान गत दोन वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देतोय.

ठळक मुद्देअलीकडे इरफानने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्याने ‘अंग्रेजी मीडियम’चे प्रमोशन करू शकत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती.

न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असलेला अभिनेता इरफान खानच्या पुनरागमनाकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. आता मात्र इरफानच्या चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. होय,  इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा येत्या 20 तारखेला  प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रकृती कारणास्तव  इरफान ‘अंग्रेजी मीडियम’च्या प्रमोशनपासून दूर आहे. मात्र अलीकडे मुंबई मिररला त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याचे आजारपण व खासगी आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितले.

‘आयुष्याचा हा काळ माझ्यासाठी एका रोलर-कोस्टर राईडसारखा आहे. यात आपण थोडे रडतो आणि अधिक हसतो, तसेच काही. या काळात मी भयंकर अस्वस्थता अनुभवली. पण कुठेतरी त्यावर नियंत्रणही मिळवले. मी माझ्या जवळच्या व्यक्तिंसाठी जगतो, जगतोय,’ असे त्याने सांगितले. 

पत्नी सुतापाबद्दलही तो भरभरून बोलला. सुतापाबद्दल काय सांगू. आठवड्याचे सातही दिवस 24 तास ती माझ्यासोबत होती. उपचाराच्या काळात तिने अगदी लहान बाळासारखी माझी काळजी घेतली. आजही घेतेय. मी आज जिवंत आहे, याचे कारण ती आहे. मला जीवदान मिळालेच तर फक्त आणि फक्त तिच्यासाठी जगायला मला आवडेल, असे तो म्हणाला.

इरफान गत दोन वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देतोय. अद्यापही तो पूर्णपणे बरा झालेला नाही. 2017 च्या जून महिन्यात त्याला कॅन्सरचे निदान झाले होते. यानंतर काम मध्येच सोडून इरफान उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाला होता.अलीकडे इरफानने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्याने ‘अंग्रेजी मीडियम’चे प्रमोशन करू शकत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. मी तुमच्यासोबत आहे आणि नाही सुद्धा... अशा त्याच्या या व्हिडीओतील शब्दांनी चाहत्यांचे डोळे पाणावले होते.

टॅग्स :इरफान खान