काय या आजाराने पीडित आहे इरफान खान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 10:17 IST
बॉलिवूड अभिनेता इरफान खान याला एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. सोमवारी खुद्द इरफाननेचं ट्विटरवर ही माहिती दिली होती. अर्थात ...
काय या आजाराने पीडित आहे इरफान खान?
बॉलिवूड अभिनेता इरफान खान याला एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. सोमवारी खुद्द इरफाननेचं ट्विटरवर ही माहिती दिली होती. अर्थात हा आजार कुठला, हे त्याने सांगितले नव्हते. पण इरफानला ब्रेन कॅन्सर असल्याची बातमी वेगाने व्हायरल होत आहे. हा ब्रेन कॅन्सर चौथ्या स्टेजवर असल्याचेही म्हटले गेले आहे. ‘सिनेस्पीक’ने दिलेल्या बातमीत इरफानला ग्लियोब्लास्टोमा मल्टीफोर्मे (जीबीएम) ग्रेड 4 ने झाला असल्याचे म्हटले आहे. याला ‘डेथ आॅन डायग्नोसिस’ही म्हटले जाते. हा जीवघेणा ब्रेन कॅन्सर आहे.दरम्यान ट्रेड अॅनालिस्ट कोमल नहाटा यांनी या बातम्या निराधार ठरवल्या आहेत. इरफान खान अस्वस्थ आहे. पण त्याच्या आजाराबद्दल ज्या बातम्या येत आहेत, त्या सगळ्या अफवा आहेत. परमेश्वराच्या कृपेने इरफान दिल्लीत आहे आणि हेच सत्य आहे, असे ट्वीट नहाटा यांनी केले आहे. ५१ वर्षांचा इरफान गेल्या १५ दिवसांपासून आजारी आहे. आधी त्याला कावीळ झाल्याचे सांगण्यात आले होते. पण यानंतर गत सोमवारी इरफानने स्वत:च टिष्ट्वटरवर एक पोस्ट लिहून आपल्या आजारपणाची माहिती दिली होती. मला दुर्धर आजाराने ग्रासले असल्याचे त्याने सांगितले होते. कधी कधी आयुष्य तुम्हाला असा काही धक्का देतो की, त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. गत १५ दिवसांपासून आयुष्य एखाद्या गूढ कथेसारखं भासू लागले आहे. हा गूढ प्रवास मला एका दुर्धर आजारापर्यंत नेईल, याची मला कल्पना नव्हती. मी नेहमी स्वत:च्या अटींवर जगलो. कधीच हार पत्करली नाही. याही वेळी पत्करणार नाही. माझे कुटुंब, मित्र माझ्यासोबत आहेत. येत्या १० दिवसांत सगळ्या वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर मी स्वत:ला तुम्हाला सगळी कहाणी सांगेल. तोपर्यंत कुठलेही तर्क वितर्क न लढवता माझ्यासाठी केवळ प्रार्थना करा, असे इरफानने लिहिले होते. इरफानच्या या ट्वीटनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ALSO READ : मला गंभीर आजार; माझ्यासाठी प्रार्थना करा! इरफान खानच्या ट्वीटमुळे चाहते चिंतीत!!