Join us

राजकुमार रावच्या 'श्रीकांत'चा प्रेरणादायी ट्रेलर! भरत जाधव, शरद केळकर खास भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 17:19 IST

राजकुमार रावच्या श्रीकांत सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये मराठमोळ्या अभिनेत्यांच्या अभिनयाची झलकही दिसून येतेय

गेल्या काही दिवसांपासून राजकुमार रावच्या आगामी 'श्रीकांत' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमात अंधत्वावर मात करुन उद्योगपती झालेल्या श्रीकांत बोल्ला यांची कहाणी पाहायला मिळणार आहे. अशातच 'श्रीकांत' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. 'श्रीकांत'च्या ट्रेलरमध्ये राजकुमार रावचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळतोच शिवाय मराठमोळे अभिनेते भरत जाधव आणि शरद केळकरही विशेष भूमिकेत दिसतात. 

'श्रीकांत'च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला पाहायला मिळतं की, राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सर्व मुलांना भविष्यात तुम्हाला काय व्हायचंय असा प्रश्न विचारतात. एक एक करुन मुलं उत्तरं देतात. तेव्हा श्रीकांत उठून सांगतो की, मी देशातला पहिला अंध राष्ट्रपती बनू इच्छितो. श्रीकांतचं उत्तर ऐकून बाकीची  मुलं हसतात. पण कलाम श्रीकांतला कौतुकाने त्याचं नाव विचारतात. पुढे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अंध असलेल्या श्रीकांतचा संघर्ष दिसतो.

श्रीकांतला त्याच्या खडतर प्रवासात त्याच्या शिक्षिका साथ देतात. अंधत्वावर मात करुन श्रीकांत व्यवसाय सुरु करतो. आणि त्यात यशस्वी होतो. 'श्रीकांत' सिनेमाचा हा ट्रेलर खुप प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे महत्वाच्या भूमिकेत भरत जाधव आणि शरद केळकर हे मराठमोळे कलाकारही पाहायला मिळतात. अभिनेत्री अलाया सुद्धा सिनेमात झळकते. राजकुमारचा अभिनय अंगावर काटा आणतो. हा सिनेमा १०  मेला रिलीज होतोय.

टॅग्स :राजकुमार रावभरत जाधवशरद केळकर