ऑस्ट्रेलियाचा पराभव करत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जोरदार धडक दिली आहे. वर्ल्डकप फायनल २०२३ चा वचपा काढत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या चारी मुंड्या चीत केल्या. मंगळवारी झालेल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन ट्रॅव्हिस हेडची विकेट सगळ्यात महत्त्वाची ठरली. गोलंदाज वरुण चक्रवर्तीने हेडला त्याच्या चक्रव्युहात अडकवत त्याची दांडी गूल केली आणि भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. पण, वरुणने हेडची विकेट घेतल्यानंतर मात्र बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला.
वरुण धवनच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या. "थँक्यू वरुण भाई...ट्रॅव्हिस हेडची विकेट घेतल्याबद्दल...", "चांगली बॉलिंग वरुण भाई", "आणखी एक विकेट क्या बात है", "बीसीसीआय वरुण धवनला टीम इंडियाचा कॅप्टन बनवा", अशा अनेक कमेंट वरुण धवनच्या पोस्टवर पडल्या. या सर्व कमेंट्सला अभिनेत्याने रिप्लायही दिला आहे. मात्र एका कमेंटला वरुण धवनने दिलेल्या उत्तराने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
क्रिकेट गली ऑफिशियल या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वरुणच्या पोस्टवर "तू वर्ल्डकप फायनल खेळायला हवा होतास", अशी कमेंट केली आहे. त्यावर अभिनेत्याने मजेशीर रिप्लाय दिला आहे. "BCCI ला सांगायला हवं होतं...मला गल्ली क्रिकेटचा ३५ वर्षांचा अनुभव आहे", असं उत्तर वरुण धवनने दिलं आहे. वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही काही कमेंट आणि मीम्स शेअर केले आहेत.
दरम्यान, दुबईच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना स्मिथ ७३ (९६) आणि कॅरीच्या ६१ (५७) अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघानं २६४ धावा करत भारतीय संघासमोर २६५ धावांचे आव्हान सेट केले होते. दुबईच्या मैदानातील हे टार्गेट पार करणे मोठे आव्हानच होते. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्ध नॉकआउट मॅचमध्ये भारताने कधीच एवढ्या धावांचा यशश्वी पाठलाग केला नव्हता. पण विराटनं ८४ (९८) क्लास खेळी केली. त्याला श्रेयस अय्यर ४५ (६२), लोकेश राहुल ४२(३४)* यांनी दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर भारतीय संघानं दुबईच मैदान मारत विक्रमी विजयासह फायनलममध्ये दाबात एन्ट्री मारलीये.