Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ अली खान प्रकरणात जितेंद्र पांडेने दिलेले महत्त्वाचे संकेत, जाणून घ्या पोलीस हल्लेखोरापर्यंत कसे पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:59 IST

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी मोहम्मद शहजादला पोलिसांनी अटक केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान(Saif Ali Khan)वर झालेल्या हल्ल्यातील आरोपी मोहम्मद शहजादला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांना लेबर कॉन्ट्रॅक्टर जितेंद्र पांडे याने आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत केली. सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दोन दिवस फरार होता. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. यासाठी पोलिसांनी ३५ हून अधिक पथके तयार केली होती.

पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान आरोपीला दादर रेल्वे स्थानकाबाहेर तीन वेळा पाहिल्याची माहिती समोर आली होती. वरळी कोळीवाड्यातही गेला होता. पोलिसांनी २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हल्लेखोर वरळी परिसरात गेल्याचे समजले होते. तिथून तो रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाला आणि नंतर अंधेरीच्या दिशेने जाणारी लोकल पकडली. अंधेरी स्थानकाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही आरोपी दिसला होता.

पोलिसांनी आरोपीला अशी केली अटकपोलिसांना लेबर कॉन्ट्रॅक्टर जितेंद्र पांडे आरोपींसोबत सीसीटीव्हीमध्ये दिसला होता. जितेंद्र पांडे अंधेरी परिसरातून वर्सोव्याकडे जाताना दिसला. पोलिसांनी दुचाकीचा क्रमांक टिपला आणि त्यानंतर पांडेपर्यंत पोहोचले. जितेंद्र पांडे याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. हल्ल्यानंतर हल्लेखोराने फोन करून घटनेची माहिती दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. जितेंद्र पांडेने हल्लेखोराची संपूर्ण माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.

जितेंद्र पांडेने केली मदत

जितेंद्र पांडेच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीचा माग काढत ठाण्यातील जंगल परिसरात असलेल्या लेबर कॅम्पमध्ये गेले. यानंतर पोलिसांनी जितेंद्र पांडेला आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर कॉल करण्यास सांगितला. जितेंद्र पांडे यांनी आरोपीशी संपर्क साधून त्याचा ठावठिकाणा विचारला. जितेंद्र पांडेच्या फोननंतर पोलिसांनी ठाणे परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली.

टॅग्स :सैफ अली खान