Join us

​मैंने प्यार किया या चित्रपटाच्या वेळी सलमान खानपेक्षा भाग्यश्रीला मिळाले होते अधिक मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 14:57 IST

अभिनेत्री भाग्यश्रीने मैंने प्यार किया या चित्रपटापासून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. तिचा हा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला ...

अभिनेत्री भाग्यश्रीने मैंने प्यार किया या चित्रपटापासून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. तिचा हा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. या चित्रपटात भाग्यश्रीने साकारलेली साधी-सरळ सुमन लोकांना मनापासून भावली. मैंने प्यार किया या चित्रपटाने सलमान आणि भाग्यश्रीचे संपूर्ण करियरच बदलून टाकले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. हा चित्रपट सलमान आणि भाग्यश्रीच्या कारकिर्दीतील पहिला हिट चित्रपट ठरला. या चित्रपटाने सलमान आणि भाग्यश्रीला पैसा, प्रसिद्धी सगळे काही मिळवून दिले. या चित्रपटासाठी सलमानला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याच्या आणि भाग्याश्रीला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात देखील आले होते. या चित्रपटातील भाग्यश्री आणि सलमानच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा रंगली होती. तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटासाठी भाग्यश्रीला सलमानपेक्षा अधिक मानधन मिळाले होते. सलमानला या चित्रपटात काम करण्यासाठी केवळ ३० हजार रुपये मिळाले होते तर भाग्यश्रीला या चित्रपटासाठी १ लाख मानधन मिळाले होते. मैंने प्यार किया या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. सलमान आज बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे. पण भाग्यश्री आज चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. भाग्यश्रीचा जन्म २३ फेब्रुवारीचा असून ती तिचे संपूर्ण नाव भाग्यश्री पटवर्धन आहे. भाग्यश्रीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही छोट्या पडद्यापासून केली. कच्ची धूप या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे कौतुक झाल्यानंतर तिला मैंने प्यार किया या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. भाग्यश्रीला अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील येत होत्या. पण भाग्यश्रीने चित्रपटांमध्ये काम न करता आपला लहानपणापासूनचा मित्र हिमालयसोबत लग्न केले. भाग्यश्री आणि हिमालय लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. पण भाग्यश्रीच्या घरच्यांना त्यांचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे हिमालय शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, त्यावेळी त्यांनी ब्रेकअप केले. तो अमेरिकेत असताना भाग्यश्रीने मैंने प्यार किया हा चित्रपट साईन केला. अर्थात हा चित्रपट साईन करण्याआधी भाग्यश्रीने हिमालयच्या आई-वडिलांची परवानगी घेतली होती. हिमालयच्या घरच्यांना भाग्यश्री आणि हिमालय यांचे नाते मनापासून मान्य होते. भाग्यश्रीचे घरातले लग्नाला सतत विरोध करत असल्याने तिने हिमालयसोबत पळून जाऊन लग्न केले. त्या दोघांच्या लग्नाला केवळ हिमालयचे कुटुंब, सलमान आणि सूरत बडजात्या उपस्थित होते. Also Read : ​हा अभिनेता आजारी पडल्यामुळेच सलमान खानला मिळाला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक