Join us

हृतिकच्या आईने केली इमान अहमदला १० लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 17:14 IST

इजिप्तहून वजन कमी करण्यासाठी भारतात आलेल्या इमान अहमद ही बॉलिवूडची चाहती असल्याचे बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. यामुळेच इमानच्या ...

इजिप्तहून वजन कमी करण्यासाठी भारतात आलेल्या इमान अहमद ही बॉलिवूडची चाहती असल्याचे बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. यामुळेच इमानच्या मदतीसाठी बॉलिवूडने पुढाकार घेतला असल्याचे समजते. अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन हिने इमान अहमदच्या सर्जरीसाठी १० लाख रुपयांची मदत केली आहे. इमानच्या सर्जरीवर सुमारे १ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत असल्याने तिला ही मदत देऊ केली आहे. इंग्रजी वर्तमानपत्र ‘मिड डे’ने दिलेल्या बातमीनुसार, पिंकी रोशन यांनी दिलेल्या या १० लाखांबाबत राकेश रोशन यांनीही दुजोरा दिला आहे. पिंकी रोशन मागील तीन महिन्यांपासून इमानसंदर्भातील बातम्यांवर लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळेच इमान मुंबईत येण्याआधी ही मदतराशी तिला पाठविली होती. इमान सध्या मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया केल्या जाणार असून यासाठी मोठा खर्च होणार आहे. दरम्यान पिंकी रोशन यांनी इमानला भेटणार असल्याचे सांगण्यात येते.बातमीनुसार, इमानबद्दल सांगताना पिंकी म्हणाल्या की, गेली २५ वर्ष कोणी अंथरुणाला खिळून राहिलेला मी विचारही करु शकत नाही. कोणाचेही आयुष्य वाचवण्यापेक्षा मोठे काहीच नाही. हृतिक इमानला भेटणार का? यावर पिंकी यांनी, सध्या हृतिक भारतात नसल्यामुळे तो इमानला भेटेल की नाही याबद्दल आता काही सांगू शकत नसल्याचे सांगितले. इमानने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. सलमानचे वडील सलीम खान यांनी सलमान खानला याबाबत अधिकृतरित्या कळविल्यास तो नक्कीच भेटायला जाईल, असे सांगितले होते. ५०० किलो वजन असलेली इमान जगातील सर्वांत लठ्ठ महिला आहे.  अत्याधिक वजन असल्यामुळे इमान हालचाल करू शकत नाही. तिच्यावर डॉ. मुज्जफल लकडावाला उपचार करीत आहेत. आम्हाला माहिती आहे की, इमानला बॉलिवूड चित्रपट व टीव्ही सिरीअल्स आवडतात, तिच्या मनोरंजनासाठी आम्ही इमानच्या खोलीत टीव्ही लावला आहे. इमानवर एक शस्त्रक्रिया झाली असून तिचे वजन ३० किलोने कमी करण्यात आले आहे.