अभिनेता हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वी हृतिक कौटुंबिक कारणांची चर्चेत आहेत. बहीण सुनैना रोशन हिचे एका मुस्लिम व्यक्तिवर प्रेम असल्याने हृतिक व हृतिकच्या वडिलांनी तिचा छळ चालवल्याचा आरोप होत आहेत. सर्वप्रथम कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैना प्रकरणाचा वाचा फोडली. यानंतर खुद्द सुनैनाने याला दुजोरा दिला होता. बॉयफ्रेन्ड मुस्लीम असल्याने घरातले माझ्यावर नाराज असल्याचे सुनैनाने सांगितले होते. आत्तापर्यंत रोशन कुटुंबीयांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती पण आता हृतिकने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत हृतिक या संपूर्ण एपिसोडवर बोलला. ‘ही आमच्या घरातील अतिशय खाजगी आणि संवेदनशील गोष्ट आहे. माझी बहीण सध्या अशा स्थितीत आहे की, तिच्याबाबत काहीही बोलणे चुकीचे ठरले. सद्यस्थितीत माझे कुटुंब एक नाही तर अनेक अडचणींमधून जात आहे,’ असे हृतिक म्हणाला.सुनैनाचा बॉयफ्रेन्ड मुस्लिम असल्याने तिच्या नात्याला विरोध केला जात आहे का? असे विचारले असता, हृतिकने नकारार्थी उत्तर दिले. ‘ तिच्या बॉयफ्रेन्डच्या धमार्बाबत बोलले जात असेल तर मी सांगू इच्छितो की, आमच्या घरात कधीच कोणत्याही धर्मावरून बोलले जात नाही. धर्म आमच्यासाठी गौण आहे. कुठलेही कुटुंब हतबल ठरेल, अशा स्थितीतून आमचे कुटुंब सध्या जात आहे,’असे तो म्हणाला.
काय आहे प्रकरण नुकतेच कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने टिष्ट्वटरवर केला होता. यानंतर खुद्द सुनैना हिनेही पिंकविला या एंटरटेनमेंट पोर्टलशी बोलताना रंगोलीचा हा आरोप खरा असल्याचे सांगितले . माझे एका मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे आणि यामुळे माझा छळ सुरु आहे. माझ्या वडिलांनी यामुळे माझ्यावर हात उचलला. माझा बॉयफ्रेन्ड रूहैल दहशतवादी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. माझ्या कुटुंबाने रूहैलचा स्वीकार करावा, अशी माझी इच्छा आहे. त्याच्यासोबत लग्नाबद्दल सध्या मी काहीही सांगू शकत नाही. पण मला त्याच्यासोबत राहायचे आहे. तो मुस्लिम आहे, केवळ यामुळे माझे कुटुंब त्याचा स्वीकार करायला तयार नाही. ते म्हणतात, त्याप्रमाणे तो दहशतवादी असता तर त्याचे फोटो गुगलवर सगळीकडे कसे असते? , असे सुनैनाने यावेळी म्हटले होते. सुनैनाच्या या खुलाशानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता.