Join us
Daily Top 2Weekly Top 5

गंगेत विसर्जित होणार नाहीत हृतिक रोशनच्या आजोबांच्या अस्थी, ही होती अंतिम इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 11:01 IST

अभिनेते राकेश रोशन यांचे सासरे आणि हृतिक रोशन याचे आजोबा जे. ओम प्रकाश यांचे काल बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली.

ठळक मुद्देजे. ओम प्रकाश हे बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते होते. आखिर क्यूँ  आणि आप की कसम हे त्यांचे गाजलेले सिनेमे.

अभिनेते राकेश रोशन यांचे सासरे आणि हृतिक रोशन याचे आजोबा जे. ओम प्रकाश यांचे काल बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, धर्मेन्द्र, जितेन्द्र असे दिग्गज कलाकार रोशन कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले. जे. ओम प्रकाश हे हिंदी सिनेमातील एक मोठे नाव होते. हिंदी सिनेमाच्या दिग्गज दिग्दर्शकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. काल अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्थात त्यांच्या शोकसभेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार,त्यांच्या निधनानंतर कुठल्याही प्रकारच्या शोकसभेचे आयोजन करू नये, अशी त्यांची अंतिम इच्छा होती. हयात असताना मुलगी पिंकी रोशन, जावई राकेश रोशन यांना त्यांनी ही अंतिम इच्छा बोलून दाखवली होती. स्वत:च्या मृत्यूपत्रातही त्यांनी याचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांच्या इच्छेचा मान राखत, जे. ओम प्रकाश यांच्या शोकसभेचे आयोजन केले जाणार नाही.याशिवाय त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी आणखी एक इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार, त्यांच्या अस्थी उत्तरेकडे वा नाशिकमध्ये विसर्जित केल्या जाऊ नयेत. मुंबईच्या समुद्रात आपले अस्थीविसर्जन व्हावे, असे त्यांनी मृत्यूपत्रात म्हटले आहे.

हृतिक रोशन आजोबांच्या अतिशय जवळ होता. ‘सुपर 30’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तो त्यांच्याबद्दल भरभरून बोलला होता. माझे नाना माझे ‘सुपर टीजर’ होते. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. आज तेच मी माझ्या मुलांना शिकवतो आहे, असे तो म्हणाला होता.  

जे. ओम प्रकाश हे बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते होते. आखिर क्यूँ  आणि आप की कसम हे त्यांचे गाजलेले सिनेमे.  1974 मध्ये ‘आप की कसम’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. अफसाना दिलवालों का, आदमी खिलौना है, आदमी और अफसाना, भगवान दादा, अपर्ण, आस पास, आशा असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.त्याआधी निर्माते अशी त्यांनी ओळख होती. 1961 साली ‘आस का पंछी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. 1975 मध्ये प्रदर्शित झालेला आणि तुफान गाजलेला ‘आँधी’ हा चित्रपटही त्यांनीच प्रोड्यूस केला.  आप की कसम, भगवान दादा, आदमी खिलौना है, अपनापन,, गेट वे आॅफ इंडिया अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

टॅग्स :हृतिक रोशन