Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनी राझदान झळकणार या वेब सीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 21:00 IST

सोनी राझदान यांनी 1981 मध्ये पदार्पण केल्यापासूनच प्रत्येक भूमिकेशी काही एक नातं असल्याचा अनुभव घेतला आहे.

सोनी राझदान यांनी नेहमीच अशा कथा निवडल्या ज्या त्यांना भावतात, ज्या कथांशी त्या स्वत:ला जोडून घेऊ शकतात, त्यात स्वत:ला पाहू शकतात. 1981 मध्ये पदार्पण केल्यापासूनच त्यांनी प्रत्येक भूमिकेशी काही एक नातं असल्याचा अनुभव घेतला आहे. त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये आजवर अनेक बदल झाले असतील. मात्र, भूमिकांशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. हॉटस्टार स्पेशल्सच्या आऊट ऑफ लव्हमध्ये त्या दिसणार आहेत. या सीरिजमध्ये त्यांनी कमल कपूर ही व्यक्तिरेखा साकारली आहे आणि तिच्याशी एक दृढ बंधही त्यांनी निर्माण केला आहे.

डिजिटल व्यासपीठांवर ज्या पद्धतीने काम केलं जातं त्याच्याशी आपण अधिक चांगल्या प्रकारे जोडले गेलोय, असं वाटणाऱ्या अनेक कलाकारांमध्ये सोनी राझदान यांचाही समावेश आहे. सिनेमा आणि टेलिव्हिजनवरील अनेक ज्येष्ठ कलाकार आता स्ट्रीमिंग व्यासपीठाकडे वळत आहेत. ठरलेला साचा मोडून काहीतरी अधिक चांगलं, वेगळं करण्याची संधी इथेच त्यांना मिळते. याबद्दल सोनी राझदान म्हणाल्या, "वेब सीरिजशी मी अधिक चांगल्या प्रकारे जोडली जाते. अलिकडे टीव्ही मालिकांशी जुळवून घेणं मला फारसं जमलेलं नाही. 

मी हल्लीच एका मालिकेत काम केलं. त्या मालिकेची कथा फार छान होती आणि त्यातील व्यक्तिरेखेशी मला स्वत:ला जोडून घेता आलं. मला वाटतं वेबसाठी लिहिल्या जाणाऱ्या कथा अधिक वास्तव, बुद्धिमान आणि छान लिहिलेल्या असतात. शिवाय, यातील व्यक्तिरेखाही छान उभ्या केल्या जातात. मला वाटतं अगदी सोपं करून सांगायचं तर तुम्ही असं म्हणू शकाल की मला जे पहायला आवडतं तेच काम करायला आवडतं." 

धुलिया आणि एयाज खान दिग्दर्शित या मालिकेत रसिका दुगल आणि पुरब कोहली यांच्या मुख्य भूमिका आहेत. रसिकाने डॉ. मीरा कपूरची तर पुरबने तिच्या नवऱ्याची-आकर्ष कपूरची भूमिका साकारली आहे. विश्वासघात आणि प्रेमभंगाने पोखरल्या गेलेल्या लग्नाच्या नात्याची कथा आऊट ऑफ लव्हमध्ये मांडण्यात आली आहे.