अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. त्यांचे लाखो चाहते आहेत. जिनिलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते आणि सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान रितेशचे वडील आणि जिनिलियाचे सासरे व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज ८०वी जयंती आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्रीने त्यांचा फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने विलासराव देशमुख यांच्या ८०व्या जयंतीनिमित्त पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री विलासराव यांच्या फोटोसमोर हात जोडून उभी आहे. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा. आम्हाला तुमची आज आणि दररोज खूप आठवण येते.
जिनिलिया आणि विलासराव देशमुख यांच्यात खूप छान नाते होते. याबद्दल अभिनेत्रीने अनेक मुलाखतीत सांगितले आहे. विलासराव जिनिलियाला वडिलांप्रमाणेच असल्याचंही तिने सांगितले होते. अभिनेत्री अनेकदा त्यांचे फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत असते.
रितेशची वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्टरितेश देशमुखने इंस्टाग्रामवर विलासराव देशमुख यांच्या ८०व्या जयंतीनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत. यानिमित्ताने संपूर्ण देशमुख कुटुंबीय हे बाभळगाव इथल्या विलासबागेत उपस्थित राहिले आहेत. तिथे कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांसोबत उपस्थित राहून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिले की, आधी आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा होता पप्पा पण आता तुमच्या नातवंडांना हा दिवस आजोबांचा दिवस बनवायचा आहे... लातूरला येताना बाभळगावला परत तुमच्या मिठीत धावल्यासारखं वाटतं. समाधान, समाधान, आनंद, आनंद. हृदय अजूनही त्या एका स्पर्शासाठी, त्या एका मिठीसाठी आणि त्या एका स्मितसाठी आतुर आहे ज्यामुळे सगळं ठीक होईल. आम्हाला माहिती आहे की तुम्ही वरून आमची वाट पाहत आहात. तुमची आठवण येते पप्पा.