८० आणि ९०च्या दशकात सुपरस्टार्समध्ये गणना केली जात असलेला अभिनेता गोविंदा गेल्या काहीकाळापासून बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अक्षरश: धडपड करीत आहे. त्यातच त्याचा ‘आ गया हिरो’ या चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल अपयश ठरल्याने त्याला त्यातून सावरणे मुश्किल होत आहे. असो, आता पुन्हा एकदा गोविंदा परतणार असून, त्याच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट लागला आहे. होय, वृत्तानुसार गोविंदा लवकरच दिग्दर्शक अभिषेक डोगरा यांच्या नव्या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘फ्राय-डे’ असे म्हटले जात आहे. या चित्रपटाला साजिद कुरेशी प्रोड्यूस करणार आहेत. अभिषेक डोगरा यांनी या अगोदर ‘डॉली की डोली’ हा चित्रपट बनविला आहे.
अभिषेक डोगरा यांनी मुंबई मिररशी बोलताना म्हटले की, ‘आम्ही या चित्रपटातून दोन दमदार लेखक राजीव आणि मनू यांना घेऊन येत आहोत. हे दोन्ही लेखक कॉमेडी लिहिण्यात वस्ताद आहेत. यांनी माझ्या चित्रपटासाठी एक जबरदस्त स्क्रिप्ट लिहिली आहे. मला आनंद होतो की, राजीव आणि मनूने कुठलाही ईगो न बाळगता ही स्क्रिप्ट लिहिली. गोविंदाच्या या चित्रपटात ‘फुकरे’ फेम वरुण शर्मादेखील बघावयास मिळणार आहे. सध्या गोविंदा श्रींलकेत असून, त्याने सांगितले की, ‘चित्रपटाची स्क्रिप्ट खूपच मनोरंजनात्मक आहे. प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करेल यात काहीही शंका नाही. मी हा चित्रपट करण्यासाठी खूपच एक्सायटेड आहे.
दरम्यान, या चित्रपटात गोविंदाची हिरोइन कोण असेल हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे या चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकेल हे बघणे मजेशीर ठरेल. वरुण शर्माने गोविंदाबरोबर काम करण्यावरून सांगितले की, ‘मी गोविंदा सर यांचे चित्रपट बघूनच मोठा झालो आहे. मला खूप आनंद होत आहे की, मी त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे मला त्यांच्यासोबत खूप काही शिकायला मिळणार आहे. गोविंंदा सर लिजेंड असून, त्यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळाच आनंद असेल. त्यामुळे मी या चित्रपटाविषयी खूप उत्साही आहे.