ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रेट ली अनइंडियन या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयाच्या इंनिगला सुरुवात करत आहे. ब्रेट लीचा हा चित्रपट ऑस्ट्रेलियात प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे त्याच्या फॅन्सने कौतुक केले आहे. आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. ब्रेट ली सध्या भारतात असून मुंबईतील पाऊस एन्जॉय करत असल्याचे सांगतो. त्याच्या या नव्या इनिंगबाबत त्याने सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...
क्रिकेटर असताना अभिनय करण्याचा विचार कसा केलास?
क्रिकेटर बनण्याचे स्वप्न मी लहानपणापासूनच पाहात होतो. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भरपूर मेहनत घेतली आणि मी घेतलेल्या मेहनतीमुळेच आज क्रिकेटमध्ये माझे नाव प्रसिद्ध आहे. मी अभिनय करण्याचा कधी विचार केला नसला तरी मला चित्रपट पाहाण्याची प्रचंड आवड होती. मला बॉलिवुडमधून या आधीही अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. पण मी क्रिकेटमध्ये व्यग्र असल्याने मी नकार दिला होता. अनइंडियन या चित्रपटाची ऑफर आली, त्यावेळी मी क्रिकेटमधूनही निवृत्त झाला होतो. त्यामुळे मी अभिनय करण्याचा विचार केला.
अभिनय आणि क्रिकेट यामध्ये कोणती गोष्ट कठीण आहे असे तुला वाटते?
नक्कीच अभिनय करणे. मी कॅमेऱ्यासमोर जाण्यापूर्वी अभिनयाचे धडे गिरवले तरीही मी चांगला अभिनय करू शकेन का याची मला शंका होती. सिडनीमध्ये मला अभिनय शिकवण्यासाठी खास लोकांची नेमणूक करण्यात आली होती.चित्रीकरणाच्या सुरुवातीला अभिनय करताना मी नर्व्हस असलो तरी आता अभिनय करणे ही गोष्ट मला आवडायला लागली आहे.
कॅमेऱ्यासमोर जाण्याचा अनुभव कसा होता?
मी गेली 20 वर्षं क्रिकेट खेळत असल्याने कॅमेरा हा माझ्यासाठी नवीन नाहीये. मी क्रिकेट खेळण्यासोबतच कॉमेंट्री केलेली आहे. तसेच मी काही जाहिरातींमध्येही काम केलेले आहे. त्यामुळे कॅमेऱ्याला सामोरे जाणे माझ्यासाठी नवीन नव्हतं. पण चित्रपट करत असताना तुम्ही दुसरी व्यक्तिरेेखा साकारत असतात, ती व्यक्तिरेखा आत्मसात करणे, त्या व्यक्तिरेखेप्रमाणेच वागणे या गोष्टी माझ्यासाठी आव्हानात्मक होत्या.
अनइंडियन या चित्रपटाबाबत काय सांगशील?
मी या चित्रपटाचा दिग्दर्शक अनुपम शर्माला कित्येक वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे मी त्याच्यासोबत खूपच कर्म्फटेबल होतो. त्याच्यावर विश्वास असल्यानेच मी चित्रपटात काम करण्याचे ठरवले होते. चित्रीकरणाच्यावेळी बारीकसारीक गोष्टीदेखील तो मला समजावून सांगत असे. तसेच तनिषा चॅटर्जीकडूनही मला खूप काही शिकायला मिळाले. ती केवळ एक चांगली अभिनेत्रीच नाही तर एक चांगली व्यक्तीदेखील आहे. या चित्रपटातील इंटिमेट दृश्य चित्रीत करायला आधी मी घाबरलो होतो. पण तनिषाने मला खूपच समजून घेतले.
भविष्यात बॉलिवुडमध्ये काम करण्याचा काही विचार आहे का?
प्रिती झिंटा, शाहरुख खान असे बॉलिवुडमध्ये माझे खूप चांगले मित्रमैत्रीण आहेत. प्रीती, शाहरुख, अमिताभ बच्चन तसेच बॉलिवुड चित्रपटांचा मी मोठा फॅन आहे. अनइंडियन या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहूनच मी बॉलिवुडमध्ये काम करण्याचा विचार करणार आहे. मला हिंदी येत नसल्याने चित्रपटात एखाद्या फिरंगीची भूमिका साकारायला आवडेल. मुझे थोडा थोडा हिंदी आता है. पण हे काही शब्द येऊन मी हिंदी बोलू शकत नाही. त्यामुळे मी फिरंगी म्हणूनच चित्रपटात झळकेल असा विचार केलेला आहे.
तुझ्या क्रिकेटर्स मित्रांचे तुझ्या अभिनयाबद्दल काय म्हणणे आहे?
हा चित्रपट ऑस्ट्रेलियात प्रदर्शित झाला असल्याने माझ्या ऑस्ट्रेलियातील क्रिकेटर मित्रांनी हा चित्रपट पाहिला आहे. त्यांना माझा अभिनय खूपच आवडला. आता भारतातील माझ्या क्रिकेटर मित्रांनी चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे. मी त्यांना नक्कीच चित्रपट पाहाण्यासाठी बोलवणार आहे. मी अभिनय करतोय हे कळल्यावर त्यांना आश्चर्य वाटले आहे. माझा चित्रपट पाहाण्यास ते उत्सुक असल्याचे त्यांनी मला सांगितले.