शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर येणार लवकरच चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 14:08 IST
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर लवकरच हिंदी चित्रपट बनवला जाणार असून हा चित्रपट दुसरे कोणीही नव्हे तर त्यांच्याच कुटुंबातील ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर येणार लवकरच चित्रपट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर लवकरच हिंदी चित्रपट बनवला जाणार असून हा चित्रपट दुसरे कोणीही नव्हे तर त्यांच्याच कुटुंबातील एक सदस्य बनवणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल ठाकरे करणार आहे. राहुल ठाकरे बाळासाहेबांचा नातू आहे. जयदेव आणि स्मिता ठाकरे यांचा राहुल हा मुलगा आहे. राहुलने कॅनडात फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले आहे. तसेच आमिर खानच्या पीके चित्रपटासाठी त्याने राजू हिरानी यांचा सहाय्यक म्हणूनही काम पाहिले होते आणि आता राहुल आपल्या लाडक्या आजोबांवर म्हणजे बाळासाहेबांवर चित्रपट बनवणार आहे. राहुल बाळासाहेब ठाकरेंवर बायोपिक बनवणार असल्याचे त्याने नुकतेच लोकांना सांगितले आहे. त्याने दसऱ्याला फेसबुक या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून लोकांना याबाबत सांगितले. दसऱ्याच्या दिवशी त्याने फेसबुकवर या चित्रपटाचे टीझर पोस्टर रिलीज केले. या चित्रपटाचे नाव ‘बाळासाहेब ठाकरे’ हेच असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राहुल स्वतः करणार आहे. हिंदीतले एक आणि मराठीतले एक असे दोन प्रख्यात लेखकही या प्रोजेक्टमध्ये त्याच्यासोबत सहभागी होणार आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता लोकांना लागली आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी कलाकार शोधणे हे खरे तर खूप कठीण काम आहे. सर्वसामान्य शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारा मराठी माणूस सहज स्वीकारेल अशा क्षमतेचा अभिनेता या चित्रपटासाठी योग्य ठरेल. त्यामुळे बाळासाहेबांसारखा दिसणारा, त्यांचासारखा वावरणारा, त्यांच्या लकबी सहज आत्मसात करणारा अभिनेता कोण असू शकतो हा सध्या कुतूहलाचा विषय बनला आहे.चित्रपटाच्या पोस्टरवर शिवसेनेचा वाघ आणि बाळासाहेबांची ओळख असलेला त्यांचा चष्मा पाहायला मिळत आहे. या पोस्टरवरच्या वाघाचे चित्र हे स्वतः राहुलने काढले आहे. फेसबुकला चित्रपटाची घोषणा करताना राहुलने एक पोस्ट देखील लिहिली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, फोटोग्राफीची आवड मला उद्धव काका (उद्धव ठाकरे) यांच्यामुळे लागली. त्यांनी फोटोग्राफीच्या दुनियेशी माझी ओळख करून दिल्याबद्दल त्यांचे मी नक्कीच आभार मानेन तर सिनेमाचा अभ्यास करण्यासाठी राज काकांनी (राज ठाकरे) मला नेहमीच प्रोत्साहन दिले.