डर : शाहरुख अन् २३ वर्षांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 19:39 IST
23 Year of Shahrukh Khan Darr ; डर या चित्रपटात शाहरुख खान सोबतच जुही चावला व सनी देओल यांच्या मुख्य भूमिका होत्या. शाहरुखची भूमिका नकारात्मक होती. एकतर्फी प्रेम करणारा युवक राहुल हा त्याच ताकदीने शाहरुखने रंगविला.
डर : शाहरुख अन् २३ वर्षांचा प्रवास
‘आय लव्ह यू क...किरण’ आणि ‘डर’ या चित्रपटाचे एक समीकरण आहे. शाहरुख खान याने साकारलेला राहुल मेहरा आजही अनेकांच्या डोक्यात तसाच आहे, जसा २३ वर्षांपूर्वी होता. २४ डिसेंबर १९९३ साली रिलीज झालेल्या या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एका स्टारचा उदय झाला होता. डर या चित्रपटात शाहरुख खान सोबतच जुही चावला व सनी देओल यांच्या मुख्य भूमिका होत्या. शाहरुखची भूमिका नकारात्मक होती. एकतर्फी प्रेम करणारा युवक राहुल हा त्याच ताकदीने शाहरुखने रंगविला. यश चोपडा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर अपार यश मिळविले. विशेषत: याचा फायदा शाहरुखला सर्वाधिक झाला. या चित्रपटातील राहुलच्या भूमिकेसाठी अनेक कलावंतांनी नकार दिला होता. सुनील मल्होत्रा ही भूमिका सनी देओल साकारणार हे निश्चित झाल्यावर यश चोपडा यांनी राहुलच्या भूमिकेसाठी अजय देवगनशी संपर्क साधला मात्र, त्याने भूमिका नकारात्मक असल्याचे सांगून नकार दिला. यानंतर आमिर खान याने ही भूमिका करण्याचे मान्य केले. मात्र, यासाठी एक अट ठेवली. स्क्रीप्ट ऐकल्यावर तो होकार देणार होता. यश चोपडा यांना हे मान्य नव्हते. आमिरच्या मते तो आणि सनी यांनी एकत्र स्क्रीप्ट ऐकावी ज्यामुळे कुणाला अधिकवेळ पडदा शेअर करता येणार आहे याचा अंदाज येणार होता. पुढे चालून कोणताही वाद नको असे आमिरचे मत होते. हे यश चोपडा यांना मान्य नव्हते. ही गोष्ट आमिरच्या कानी पडल्यावर त्याने या चित्रपटाला नकार दिला. यामागील आणखी एक कारण होते. यश चोपडा दिग्दर्शित ‘परंपरा’ या चित्रपटात आमिरने काम केले होते मात्र त्याला हा चित्रपट अजिबात आवडला नव्हता. राहुलच्या भूमिकेसाठी यश चोपडा यांनी शाहरुखशी बोलणी केली. शाहरुखने लगेच होकार दिला. अन या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली. या चित्रपटामुळे शाहरुख व यश चोपडा यांचे संबंध मजबूत झाले. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. शाहरुखच्या अभिनयाची प्रशंसा झाली. या चित्रपटातील ‘जादू तेरी नजर... ’ हे गीत व शाहरुखचे डॉयलॉग आजही शाहरुखच्या चाहत्यांच्या ओठी आहे. पाहुया याच चित्रपटातील हे गाणे....