Abir Gulaal: बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांचा बहुचर्चित चित्रपट 'अबीर गुलाल' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुरुवातीला ९ मे २०२५ रोजी भारतात प्रदर्शित होणार होता. पण, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चित्रपट प्रदर्शनावर भारतात बंदी घालण्यात आली. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दिलजीत दोसांझच्या 'सरदार जी ३'च्या धर्तीवर 'अबीर गुलाल' भारत वगळता जगभरात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
बिझ एशिया लाईव्हच्या वृत्तानुसार, वाणी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २९ ऑगस्ट २०२५ रोजी जगभरातील प्रेक्षकांसाठी रिलीज होणार आहे. मात्र, भारतातील प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळणार नाही. अलीकडेच दिलजीत दोसांझचा 'सरदार जी ३' भारत देश सोडून जगभरात प्रदर्शित झाला. 'अबीर गुलाल' चे निर्मातेही तीच रणनीती अवलंबत असून भारताबाहेरील प्रेक्षकांसाठीच हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
फवाद खान याने याआधी देखील काही भारतीय चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र, उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. इतक्या वर्षांनंतर फवाद पुन्हा एकदा भारतीय मनोरंजन विश्वात पदार्पण करण्याच्या तयारीत होता. 'अबीर गुलाल' या चित्रपटातफवाद खान आणि वाणी कपूर यांच्यासह लीजा हेडन, सोनी राजदान, रिद्धी डोगरा, फरीदा जलाल, परमीत सौठी अशी स्टारकास्ट आहे. या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये झालं होतं. आरती एस बागरी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकार आणि तंत्रज्ञांना कोणतीही मदत न करण्याचे आवाहन एफडब्लूआयसीईच्या वतीने करण्यात आले आहे. पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या कलाकृतींवर भारतात बंदी घालण्यात आली. शिवाय अनेक कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स देखील बॅन करण्यात आले आहेत.