नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री फराहने या अभिनेत्यासोबत केला दुसरा विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 16:56 IST
फराहने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने केवळ वयाच्या १७ व्या वर्षी फासले या चित्रपटापासून ...
नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री फराहने या अभिनेत्यासोबत केला दुसरा विवाह
फराहने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने केवळ वयाच्या १७ व्या वर्षी फासले या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिची गोविंदा सोबतची जोडी तर प्रचंड हिट झाली होती. फराहने दारा सिंग यांचा मुलगा विंदू दारा सिंग सोबत लग्न केले होते. फराह आणि विंदू यांची एका चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली होती आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काहीच महिन्यांच्या नात्यामध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण विंदू त्याच्या करियरमध्ये सेटल नसल्याने फराहच्या आईने या लग्नाला विरोध केला. पण फराह आपल्या निर्णयावर ठाम होती. विंदूसोबत लग्न केल्यानंतर तिने चित्रपटात काम करण्याचे प्रमाण खूपच कमी केले. ती २००० नंतर हलचल, शिकार यांसारख्या काहीच चित्रपटांमध्ये झळकली. आज फराह चित्रपटात काम करत नसली तरी तिच्या अभिनयाचे आजही कौतुक केले जाते. नव्वदीच्या दशकातील अतिशय सुंदर अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. फराह ही प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे.फराहचे व्यवसायिक आयुष्य जितके चर्चेत राहिले, तितकेच तिची खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेचा विषय बनले. विंदू दारा सिंग आणि फराह यांना एक मुलगा आहे. मुलाच्या जन्मानंतर फराह आणि विंदू यांच्यात सतत भांडणे होऊ लागली आणि त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. आज विंदू आणि फराह आपापल्या आयुष्यात खूश असून ते सध्या आपापल्या जोडीदारासोबत राहात आहेत. विंदूसोबत घटस्फोट झाल्यानंतर फराहने नव्वदीच्या दशकातील एका अभिनेत्यासोबत लग्न केले. सुमीत सेहगलने स्वर्ग जैसा घर, मेरी ललकार, तमाचा, परम धर्म, इन्सानियत के दुश्मन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुमीत आणि फराह यांनी काही वर्षांपूर्वी लग्न केले. सुमीतचे देखील हे दुसरे लग्न आहे. सुमीतचे पहिले लग्न सायरा बानू यांची भाची शाहीन सोबत झाले होते. शाहीन आणि सुमीत यांना सायशा नावाची मुलगी असून तिने देखील बॉलिवूडमधील तिच्या कारकिर्दीला नुकतीच सुरुवात केली आहे.