माधुरी दीक्षितबरोबर लग्न करण्याची संजय दत्तची अजूनही इच्छा; पहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 17:29 IST
संजूबाबा आजही माधुरीवर प्रेम करतो, तिच्याशी लग्न करण्यास तो आजही उत्सुक असल्याचे तो म्हणतो.
माधुरी दीक्षितबरोबर लग्न करण्याची संजय दत्तची अजूनही इच्छा; पहा व्हिडीओ!
संजय दत्त बॉलिवूडमधील असा अभिनेता आहे, ज्याच्याशी अनेक घटना, घडामोडी घडलेल्या आहेत. संजय दत्त असे पुस्तक आहे, जेवढे वाचले तेवढी त्यामध्ये रुची वाढत जाते. त्यामुळे संजूबाबाला बॉलिवूडमधील सर्वात कॉन्ट्रोव्हर्शियल आणि प्रेक्षकांचा सर्वात लाडका कलाकार असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. संजूबाबा गेल्या कित्येक दशकांपासून बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह आहे. त्याच्या या प्रवासात त्याच्याशी अनेक अभिनेत्रींची नावे जोडली गेली. परंतु त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले ते माधुरी दीक्षित हे नाव. असे म्हटले जात आहे की, एक काळ असा होता की, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याचदरम्यान संजूबाबा अनेक प्रकरणांमध्ये गुंतत गेल्याने माधुरीने त्याच्यापासून दूर जाणे पसंत केले. परंतु संजूबाबा कधीही माधुरीपासून दूर गेला नाही. उलट आजही तो तिच्याशी लग्न करण्यास उत्सुक असल्याचे तो म्हणतो. बातम्यांनुसार ९० च्या दशकात संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यातील प्रेमप्रकरण चांगलेच बहरले होते. दोघे एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत होते. त्यांच्यातील चर्चा सर्वदूर रंगत असत. पुढे दोघांनी लग्नाचाही विचार केला होता; मात्र याचदरम्यान संजूबाबाचे नाव अवैध शस्त्रास्त्रे बाळगण्याच्या प्रकरणात पुढे आले. तेव्हा माधुरीच्या कुटुंबीयांनी संजूबाबा सोबतचे नाते तोडण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. माधुरीनेदेखील कुटुंबीयांचे ऐकत संजूबाबापासून दूर जाणे पसंत केले. अशाप्रकारे हे दोन प्रेमी एकमेकांपासून विभक्त झाले. परंतु संजूबाबा अजूनही माधुरीला विसरू शकला नाही. जर तुम्ही असा विचार करीत असाल की, आम्ही आता हे सगळं का सांगत आहोत, तर हे आम्ही सांगत नसून संजूबाबा यानेच हे सांगितले आहे. गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका फेस्टमध्ये संजय दत्त सहभागी झाला होता. ज्याठिकाणी त्याने त्याच्या आयुष्याशी संबंधित सर्व किस्से सांगितले. याचदम्यान त्याला विचारण्यात आले की, जर तुला आज एखाद्या अभिनेत्रीबरोबर लग्न करण्याची संधी मिळाली तर तू कोणत्या अभिनेत्रीबरोबर लग्न करणार? याचे उत्तर देताना संजूबाबाने लगेचच माधुरी दीक्षितचे नाव घेतले. संजूबाबाचे हे उत्तर अनेकांना अचंबित करणारे होते. त्याचबरोबर तो आजही माधुरीवर प्रेम करतो हेही दाखवून देणारे होते. अर्थात संजूबाबाने हे उत्तर चेष्टामस्करीत दिल्याचा नंतर उलगडा करण्यात आला. परंतु वास्तवात संजूबाबा माधुरीला अजूनही विसरला नाही हेही तेवढेच खरे आहे. खरं तर माधुरीच्या सौंदर्याचे आजही अनेक अभिनेते दिवाने आहेत. मग संजूबाबाचे तर तिच्यासोबत एक खास नाते राहिले आहे. अशात त्याने ही अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही.