Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर २'मुळे अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ला फटका, पुन्हा बदलली सिनेमाची रिलीज डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:05 IST

रोज नवे रेकॉर्ड 'धुरंधर २' बॉक्स ऑफिसवर बनवत आहे. पण याचा फटका मात्र अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' सिनेमाला बसला आहे.

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 'धुरंधर २'ने अख्खं मार्केटच खाऊन टाकलं आहे. रोज नवे रेकॉर्ड 'धुरंधर २' बॉक्स ऑफिसवर बनवत आहे. पण याचा फटका मात्र अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' सिनेमाला बसला आहे. धुरंधर २ मुळे 'भूत बंगला'ची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात १० एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र आता सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 

‘भूत बंगला’बाबतची उत्सुकता सातत्याने वाढत आहे. सिनेमाची रोचक झलक आणि गाजलेल्या गाण्यांनी आधीच धूम उडवली असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट एक मनोरंजक कौटुंबिक करमणूक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत असून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, आता चाहत्यांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. चित्रपटाचे पेड प्रिव्ह्यू शो १६ एप्रिल २०२६ पासून रात्री ९ वाजल्यापासून सुरू होणार आहेत. 

निर्माती एकता कपूरने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. “आमच्या वितरण भागीदारांशी आणि मोठ्या बाजारपेठेतील चित्रपटगृह चालकांशी सविस्तर चर्चा आणि त्यांच्या अनेक विनंत्यांनंतर आम्ही ‘भूत बंगला’चे प्रदर्शन एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांना उत्तम चित्रपटगृह अनुभव देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि या निर्णयामुळे चित्रपटाला फायदा होईल तसेच चित्रपटगृहांत त्याला दीर्घ आणि यशस्वी धाव मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. धुरंधर: द रिव्हेंज सध्या बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. ही संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे. चित्रपटगृह चालकांना वाटते की या चित्रपटाला स्वच्छ आणि अडथळारहित आठवडा देणे सर्वांसाठी योग्य ठरेल”, असं तिने म्हटलं आहे. 

पुढे ती म्हणते, “‘भूत बंगला’ एक आठवडा पुढे नेऊन आम्ही दोन्ही चित्रपटांना योग्य चित्रपटगृह जागा, प्रचाराचे लक्ष आणि प्रेक्षकांचे लक्ष मिळेल याची खात्री करत आहोत. हा निर्णय सर्वांसाठी फायदेशीर ठरेल. निर्मात्यांसाठी, चित्रपटगृह चालकांसाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांसाठी. आम्ही नेहमी चित्रपटगृहात जाणाऱ्या प्रेक्षकांच्या सोयीला प्राधान्य देऊ आणि त्यांच्या उत्कृष्ट मनोरंजनासाठी प्रयत्न करत राहू.”

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar 2' impacts Akshay Kumar's 'Bhoot Bungalow,' release date changed.

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' success delays Akshay Kumar's 'Bhoot Bungalow' release. The family entertainer now has paid previews from April 16, 2026, says producer Ekta Kapoor, ensuring optimal theatrical space for both films.
टॅग्स :धुरंधर सिनेमाअक्षय कुमार