लिपोसक्शन सर्जरीमुळे या अभिनेत्रीचे वयाच्या ३१व्या वर्षी झाले निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 12:48 IST
आरती अग्रवालने पागलपन या हिंदी चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर ती अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकली. तिचे ...
लिपोसक्शन सर्जरीमुळे या अभिनेत्रीचे वयाच्या ३१व्या वर्षी झाले निधन
आरती अग्रवालने पागलपन या हिंदी चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर ती अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकली. तिचे अनेक दाक्षिणात्य चित्रपट हिट देखील झाले. तिला तिच्या अनेक चित्रपटांसाठी पुरस्कार देखील मिळाले होते. आरतीने चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबू, रवी तेजा, जूनियर एनटीआर, प्रभाससह दक्षिणेतील अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले होते. आरतीने २००१ मध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने तिच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत २० हून अधिक चित्रपटात काम केले. आरती अग्रवालने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तिचा चांगलाच दबदबा निर्माण केला होता. पण वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी तिचे निधन झाले. आरती ही अभिनेता सुनील शेट्टीमुळे अभिनयक्षेत्रात आली होती. ती केवळ १४ वर्षांची असताना फिलाडेल्फिया, पेन्सिलवेनिया सिटीत झालेल्या एका कार्यक्रमात सुनीलने तिला स्टेजवर डान्स करताना पाहिले होते. तिचा डान्स पाहून सुनील प्रभावित झाला होता आणि त्याने तिच्या वडिलांना आरतीने बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत सुचवले होते. त्यामुळे तिने त्यानंतर दोनच वर्षांत म्हणजे तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षी पागलपन या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आरतीच्या व्यवसायिक आयुष्याइतके तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले. २००५ मध्ये तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ती अनेक दिवस व्हेंटिलेटरवर देखील होती. आत्महत्या करण्यामागचे तिचे कारण तिने कधीच सांगितले नाही. त्यानंतर दोनच वर्षांत तिने युएसमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत लग्न केले. पण त्यांचे लग्न केवळ दोनच वर्षांत टिकले. २००९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. ६ जून २०१५ ला न्यू जर्सीतील एका रुग्णालयात आरतीचे निधन झाले. आरतीने लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिपोसक्शन सर्जरी केली होती. तिच्या मृत्यूच्या सहा आठवडे आधी तिने ही सर्जरी केली होती. ही सर्जरी केल्याने तिचा जीव धोक्यात येऊ शकतो असे तिला काही डॉक्टरांनी बजावले देखील होते. पण तरीही तिने ही सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. या सर्जरीनंतर तिला श्वासोच्छवास घ्यायला त्रास व्हायला लागला. त्यामुळे तिला न्यू जर्सी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचे तिच्या मॅनेजरने मीडियाला सांगितले होते.