Join us

​दुबई पोलिसांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणाचा अहवाल केला सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 16:31 IST

श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणाचा अहवाल दुबई पोलिसांनी सादर केला असून श्रीदेवी यांचा मृत्यू हा केवळ अपघात असल्याचे त्यांनी त्यांच्या अहवालात ...

श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणाचा अहवाल दुबई पोलिसांनी सादर केला असून श्रीदेवी यांचा मृत्यू हा केवळ अपघात असल्याचे त्यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे बोनी कपूर यांना त्यांचा पासपोर्ट परत करण्यात आला आहे. बोनी यांना पासपोर्ट मिळाल्यामुळे ते देखील दुबईहून काहीच वेळात मुंबईला रवाना होणार आहेत. श्रीदेवी यांचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाल्याचे फॉरेन्सिक अहवालात म्हटले गेले होते. श्रीदेवी यांचा बाथटब मध्ये बुडून मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. श्रीदेवी यांच्यासोबत त्यावेळी त्यांचे पती बोनी कपूरदेखील हॉटेलच्या रूममध्ये हजर होते. त्यामुळे बोनी कपूर यांना चौकशीसाठी दुबई पोलिसांनी बोलावले होते. त्यांची चौकशी केल्यानंतर दुबई पोलिसांनी त्यांना क्लिन चीट दिली आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव कोणत्याही क्षणी त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येऊ शकते. इंडिया इन दुबई या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटद्वारे सांगण्यात आले आहे की, मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे दुबई पोलिसांनी दिलेली आहेत. त्यामुळे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्याची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन देण्यात येईल असे सूत्रांकडून समजतेय. श्रीदेवी यांचे पार्थिव अनिल अंबानी यांच्या चार्टड विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी सध्या मुंबईत सुरू आहे. उद्या सकाळी ८ ते १० या दरम्यान अंतिम दर्शनासाठी पार्थिव वर्सोवा येथील श्रीदेवीच्या बंगल्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम यात्रेला सुरुवात होईल.श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. Also Read : ​ही होती श्रीदेवी यांची अंतिम इच्छा