Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला माहीत आहे का फारुख शेख अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वकील होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 11:10 IST

फारुक शेख यांनी नुरी, उमराव जान, चष्मे बद्दूर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म 25 मार्च ...

फारुक शेख यांनी नुरी, उमराव जान, चष्मे बद्दूर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म 25 मार्च 1948ला झाला होता. त्यांच्या जन्मदिवसाबद्दल जाणून घेऊया त्यांच्याविषयी कधीही न ऐकलेल्या या काही गोष्टी...फारुख शेख यांनी केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे तर छोट्या पडद्यावरदेखील आपली एक वेगळी ओळख बनवली होती. फारुख हे त्यांच्या खऱ्या आयुष्यात अतिशय साधे होते. त्यांचे वडील मुस्तफा शेख हे प्रसिद्ध वकील असल्याने त्यांनीदेखील वकील व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. फारुख यांनीदेखील वकील बनण्याचा विचार केला होता आणि त्यासाठी त्यांनी मुंबईतील सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून वकिलीचे शिक्षणदेखील घेतले होते. पण वकील बनल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, हा व्यवसाय त्यांच्यासारख्या लोकांसाठी नाहीये. अनेक केसेसमध्ये निर्णय कोर्टात नाही तर पोलिस स्टेशनमध्येच घेतला जातो असे त्यांचे स्पष्ट मत होते आणि त्यामुळे त्यांनी वकिली सोडून दिली. त्यांचे शिक्षण मुंबईतील सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण झाले होते. त्यांना शिक्षणासोबतच खेळ, नाटक या गोष्टींची आवड होती. त्यांना पाच भावंडे असून फारुख सगळ्यांमध्ये मोठे होते. फारुक हे उत्कृष्ट अभिनेते असण्यासोबत उत्कृष्ट क्रिकेटरदेखील होते.फारुख यांनी 1973 साली प्रदर्शित झालेल्या गरम हवा या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाची निर्मिती रमेश सथ्यू यांनी केली होती. एकही पैसे न घेणारा नायक त्यांना चित्रपटासाठी हवा होता. फारुख यांनीदेखील एक रुपयादेखील न घेता या चित्रपटासाठी होकार दिला. या चित्रपटासाठी त्यांना पाच वर्षांनंतर निर्मात्यांनी 750 रुपये दिले होते. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्याने त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. फारुख शेख यांनी रेखा, शबाना आझमी यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले असले तरी त्यांची जोडी दिप्ती नवलसोबत जास्त फेमस झाली. दिप्ती खऱ्या आयुष्यातही त्यांची खूप चांगली मैत्रीण होती. उमराव जान, साथ साथ, चष्मे बद्दूर, नूरी यांसारख्या चित्रपटांनी त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. फारुख यांच्या चमत्कार, जी मंत्रीजी यांसारख्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. तसेच जीना इसी का नाम है या कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन करत असत. विविध क्षेत्रातील मान्यवारांसोबत ते या कार्यक्रमात गप्पा मारत असत. फारुख शेख आणि त्यांची पत्नी रूपा जैन यांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. नऊ वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. फारुख शेख यांच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. पण त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या लहान भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यावेळी त्यांनी रेडिओ आणि टिव्हीवर अनेक कार्यक्रम केले. पण पैशांच्या मागे पळणे त्यांना पटत नसे. त्यामुळे ते चित्रपट स्वीकारताना वर्षाला अनेक चित्रपट न स्वीकारता चांगल्या कथानकाचा एखादाच चित्रपट स्वीकारत असत. फारुख शेख यांचा मृत्यू 27 डिसेंबर 2013ला हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत झाला. दुबईत ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत फिरायला गेले होते.