डिहायड्रेशन आणि किडनीच्या त्रासामुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या प्रकृतीत बºयापैकी सुधारणा झाली असल्यानेच डॉक्टरांनी हा निर्णय घेतला आहे. डिस्चार्जची अधिकृत माहिती त्यांच्या आॅफिशियल ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आली आहे. दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना सायरा बानो यांनी सांगितले की, ‘गेला आठवडा एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता. रुग्णालयात सगळ्यांनीच त्यांची खूप काळजी घेतली. जेव्हा सायरा बानो यांना पती दिलीपकुमार यांची प्रचंड काळजी घेत असल्याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, माझ्याजवळ कोहिनूर असल्यानेच मी त्याची काळजी घेत आहे. एक पत्नी म्हणून नव्हे तर त्यांची चाहती म्हणून मी त्यांची काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपचारादरम्यान दिलीपकुमार यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खूपच चिंताजनक असल्याचे बोलले जात होते. मात्र दोन दिवसांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक सुरुवातीला रुग्णालयानेच दिलीपकुमार यांच्या क्रिएटिनिन लेव्हलचा रिपोर्ट सार्वजनिक केला होता. यावेळी डॉक्टरांनी हेदेखील स्पष्ट केले होते की, सुरुवातीपेक्षा आता दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. दिलीपकुमार यांचे वय लक्षात घेता त्यांच्यावर आयसीयूमध्येच चांगल्या पद्धतीने उपचार होऊ शकतात, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले होते.
दिलीपकुमार यांना किडनीची समस्या वाढल्याने आणि हिमोग्लोबिन कमी झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. गेल्या आठवड्याच्या बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याच्या प्रकृतीविषयी सातत्याने कुठली ना कुठली बातमी समोर येत होती. यावेळी त्यांची पुतणी शाहीन यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती देताना म्हटले होते की, युसूफ अंकल यांना डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांना आयव्ही फ्लुइड देण्यात आला आहे. त्यांचा प्रोटीन लेव्हल हाय असून, डॉक्टर त्यास कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता डॉक्टरांना सबुरीने उपचार करावे लागत आहेत.
दरम्यान, दिलीपकुमार यांना डिस्चार्ज मिळाल्याने त्यांच्या चाहत्यांसह बॉलिवूडमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिलीपकुमार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा आशयाचे ट्विट केले होते.