Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप कुमार यांनी या अभिनेत्रीसोबत केली होती वाईट वर्तणूक, त्यानंतर अभिनेत्याला झाला होता खूप पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 09:51 IST

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. सकाळी ७.३० वाजता त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. संध्याकाळी ५ वाजता जुहूच्या कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी पार पडणार आहे. १९४४ मध्ये ‘ज्वार भाटा’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या दिलीप कुमार त्यांच्या काळात रोमान्सचे बादशाह होते. ‘देवदास’ या चित्रपटात त्यांनी याचे दर्शन घडवले होते. दिलीप कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये फार कमी चित्रपट केले. मात्र या मोजक्या चित्रपटांनी त्यांना सुपरस्टार बनवले होते.

दिलीप कुमार एका अभिनेत्रीसोबत असे काही वागले की, त्यांना आजही आपल्या या वागण्याचा पश्चाताप होत होता. ही अभिनेत्री म्हणजे सुरैय्या. सुरैय्याच्या करिअरला त्याकाळात अवकळा आली होती. एकेदिवशी दिलीप कुमार यांनी दिग्दर्शक आसिफ यांच्याकडे सुरैय्याच्या नावाची शिफारस केली होती. सुरैय्याला आपल्या चित्रपटात घेण्यामागे दिलीप कुमार यांचा काय हेतू होता, माहित नाही. पण आसिफ यांनी दिलीप कुमार यांचे ऐकले आणि लगेच दिलीप कुमार व सुरैय्या यांच्या‘जानवर’ या चित्रपटाची घोषणा केली. तसेच चित्रपटाचे शूटींग सुरू झाले.

पहिल्याच सीनमध्ये सुरैय्या व दिलीप यांच्यात साप चावल्याचा एक सीन होता. सुरैय्याच्या पायाला साप चावतो आणि दिलीप कुमार तोंडाने ओढून हे विष काढतो, असा हा सीन होतो. खरेतर पहिल्याच दिवशी सीन आरामात शूट झाला होता. मात्र तरीदेखील हा सीन सलग चार दिवस वारंवार शूट होत राहिला. हा सीन रोज तसाच शूट व्हायचा आणि यानिमित्ताने दिलीप कुमार यांना सुरैय्याच्या पायाचे चुंबन घ्यायची संधी मिळायची. पण एक दिवस दिलीप कुमार यांचा हेतू योग्य नसल्याचे सुरैय्याला कळून चुकले.

दिलीप कुमार आणि दिग्दर्शक यांच्यात काहीतरी शिजत असल्याचे तिला समजले आणि यानंतर जे झाले ते सगळ्यांच्याच कल्पने पलिकडचे होते. सुरैय्याने घरी गेल्यानंतर आपल्या आजीला सगळे सांगितले. यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच सीन शूटसाठी घेतला गेला आणि सुरैय्याचा राग अनावर झाला. ती उठली अन् तडक सेटवरून निघाली. सुरैय्याने चित्रपट सोडल्यानंतर आसिफ यांनी शूटींग थांबवले. पुढे हा चित्रपट थंडबस्त्यात पडला. यानंतर दिलीप कुमार व सुरैय्या यांनी कधीच एकत्र काम केले नाही.

टॅग्स :दिलीप कुमार