सिनेविश्वातील कलाकार त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. फिट राहण्यासाठी डाएटसोबतच कलाकार नियमितपणे व्यायामही करतात. अनेकदा सेलिब्रिटी व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असतात. त्यामुळेच वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही सेलिब्रिटी फिट दिसतात. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र तर वयाच्या ८९व्या वर्षीही जीममध्ये घाम गाळत आहेत.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूड गाजवलं. तरुणपणी ते मुलींच्या गळ्यातले ताईत होते. ९०च्या उंबरठ्यावर असलेले धर्मेंद्र आजही तितकेच फिट दिसतात. यामागचं सीक्रेट म्हणजे ते अजूनही नियमितपणे व्यायाम करतात. नुकतंच धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन जीममधला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते जीममध्ये दिसत असून चाहत्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देताना दिसत आहेत. "मी व्यायाम करायला सुरुवात केली आहे. फिजियोथेरेपीही सुरू केली आहे. मी खूप छान आहे. मला पाहून तुम्ही देखील खूश व्हाल, अशी अपेक्षा करतो", असं ते म्हणत आहेत.
धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांसोबतच सेलिब्रिही आश्चर्यचकित झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. रणवीर सिंगने कमेंट करत "ओरिजनलच आहेत" असं म्हटलं आहे. चाहत्यांनीही या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. "पाजी तुस्सी ग्रेट हो", "जाट बलवान, जय भगवान", "तुम्ही महान आहात", अशा कमेंट त्यांनी केल्या आहेत.