Join us

"१०० कोटी दिले तरी भन्साळींसोबत काम करणार नाही"; 'देवदास' फेम संगीतकाराने व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:11 IST

संजय लीला भन्नालींसोबत सुपरहिट सिनेमांचं संगीत करणारे इस्माइल दरबार यांनी यापुढे भन्नालींसोबत काम करणार नाही, असा आरोप केलाय

बॉलीवूडमध्ये अनेक दिग्दर्शक आणि संगीतकारांच्या जोड्यांनी एकत्र येऊन अविस्मरणीय काम केली आहेत. सुपरहिट आणि अजरामर सिनेमांमध्ये काम केलेल्या याच जोड्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केले नाही. अशीच एक जोडी म्हणजे संगीतकार इस्माइल दरबार (Ismail Darbar) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची. 'हम दिल दे चुके सनम' आणि 'देवदास' यांसारख्या हिट चित्रपटांसाठी एकत्र काम केल्यानंतर आता इस्माइल दरबार यांनी भन्साळींविरुद्ध उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे नेमका वाद?

विकी लालवानीला दिलेल्या यूट्यूब मुलाखतीत, इस्माइल दरबार यांनी संजय लीला भन्साळींसोबतच्या मतभेदांवर मौन तोडले आणि भन्साळींना 'अहंकारी' म्हटलं. त्यांच्यातील वादाचे कारण एका बातमीशी जोडले गेलं आहे.

एका लेखात इस्माइल दरबार यांच्या संगीताचे कौतुक करताना, 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या शो हिट होण्यामागे संगीताचं महत्वपूर्ण योगदान आहे, असं लिहिलं गेलं होतं. हा लेख वाचल्यानंतर भन्साळींना वाटलं की, इस्माइल दरबार यांनीच ही गोष्ट मीडियामध्ये पेरली आहे. या गैरसमजामुळे त्यांच्यात दरी निर्माण झाली.

'हीरामंडी' सोडण्याचा निर्णय

या घटनेनंतर, भन्साळींनी इस्माइल दरबार यांना ऑफिसमध्ये बोलावून त्यांना जाब विचारला. यानंतर इस्माइल दरबार यांना जाणवलं की, लवकरच भन्साळी अशी परिस्थिती निर्माण करतील, ती त्यांना स्वतःच 'हीरामंडी' सोडावी लागेल. त्यामुळे अपमान होण्याची वाट न पाहता, इस्माइल यांनी स्वतःहून या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी इतकी मेहनत करतो आणि श्रेय हे घेऊन जातात, अशी भीती भन्साळींच्या मनात निर्माण झाली होती, असं इस्माइल दरबार यांनी सांगितलं. 

'१०० कोटी दिले तरी काम करणार नाही'

संजय लीला भन्साळींसोबत भविष्यात काम करण्याच्या शक्यतेवर बोलताना इस्माइल दरबार यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, "आज जर संजय माझ्याकडे आले आणि म्हणाले, 'माझ्या चित्रपटाचे संगीत बनव, मी तुला १०० कोटी रुपये देईन', तरी मी त्यांना लगेच 'इथून चालता हो' असे सांगेन." इस्माइल दरबार यांनी 'हम दिल दे चुके सनम' आणि 'देवदास' या दोन यशस्वी चित्रपटांसाठी संगीत दिलं आहे. 'देवदास' आणि 'हम दिल दे चुके सनम'च्या वेळीही त्यांच्यात वाद होते. या वादामुळेच इस्माइल दरबार यांना 'गुजारिश' हा चित्रपटात सोडावा लागला होता. 

टॅग्स :संजय लीला भन्साळीवेबसीरिजबॉलिवूडशाहरुख खानसलमान खानऐश्वर्या राय बच्चन