बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांनी २०११ साली आजच्याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबरला जगाला अलविदा म्हटले होते. ३ डिसेंबर २०११ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी या सदाबाहर अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. लंडनच्या दा वॉशिंग्टन मेयफर हॉटेलात हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले होते.
२६ सप्टेंबर १९२३ रोजी पंजाबच्या गुरदास कस्बेमध्ये त्यांचा जन्म झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत देव आनंद यांना ‘रोमान्सचा बादशहा’ म्हणून ओळखले जाते. आपल्या आत्मकथेची सुरूवातही त्यांनी ‘रोमांसिंग विद लाईफ’या शीर्षकाने केली आहे. आज देव आनंद आपल्यात नाहीत. पण त्यांचे चित्रपट आणि त्यांच्या रूपातील एक चिरतरूण अभिनेता आजही सर्व सिनेरसिकांच्या मनात जिवंत आहे.
देव आनंद यांचे वडील वकील होते. पण देव आनंद यांना अभिनयात रस होता. हिरो बनण्याच्या ध्यासापोटी देव आनंद मुंबईत आले. त्यावेळी त्यांच्या खिशात केवळ ३० रुपए होते. ना ओळख, ना डोक्यावर छत. ३० रुपए संपल्यानंतर देव आनंद यांनी मिल्ट्री सेंसर आॅफिसमध्ये १६५ रुपए मासिक वेतनावर काम सुरु केले. सुमारे वर्षभर त्यांनी या ठिकाणी नोकरी केली. याठिकाणी त्यांना सैनिकांची पत्रे वाचण्याची कामे करावी लागायची. पत्रामध्ये काही विनाकारणची माहिती असेल तर त्या पत्राचे सेन्सॉर करण्याचे त्यांचे काम होते.
मिलिट्री सेन्सॉर आॅफिसमध्ये काम केल्यानंतर देव आनंद यांनी काही काळ अकाऊंटींग फर्ममध्येही नोकरी केली होती. याठिकाणीही देवसाहेब क्लर्क म्हणूनच काम करत होते.