Join us

'दिल्ली क्राइम'ला मिळाला इंटरनॅशनल एमी अवॉर्ड, शेफाली शाहने व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 19:50 IST

२०१२ साली दिल्लीत झालेल्या गँगरेपवर आधारीत 'दिल्ली क्राइम' ही सीरिज आहे.

अभिनेत्री शेफाली शाह यांची वेबसीरिज दिल्ली क्राइमला ४८व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ४८व्या वर्षात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स लाइव्ह पार पडला. नेटफ्लिक्सवरील दिल्ली क्राइम ही पहिली वेबसीरिज ठरली जिला एमी अवॉर्ड्स मिळाला आहे. २०१२ साली दिल्लीत झालेल्या गँगरेपवर आधारीत ही सीरिज आहे.

दिल्ली क्राइममधील अभिनेत्री शेफाली शाहने या सीरिजला एमी अवॉर्ड्स मिळाल्याचा आनंद व्यक्त करत म्हटले की, मी खूप खूश आहे. हे खूप अप्रतिम आहे. दिल्ली क्राइमचा हिस्सा बनल्यामुळे मला खूप अभिमानास्पद वाटत आहे. हा विजय माझ्यासाठी सोने पे सुहागा आहे. मला माहित आहे की माझ्यासाठी हा शो खूप स्पेशल आहे. एमीने आम्हाला जागतिक मंचावर आणले आहे आणि या सन्मानामुळे अभिमानास्पद वाटत आहे.

दिल्ली क्राइम वेबसीरिजमध्ये शेफाली शाहने पोलीस उपायुक्त वर्तिका चतुर्वेदीची भूमिका साकारली होती. या सीरिजचे दिग्दर्शन रिची मेहताने केले होते. या सीरिजमध्ये शेफाली शाह व्यतिरिक्त राजेश तेलंग, आदिल हुसैन, रसिका दुग्गल, गोपाल दत्त तिवारी, जया भट्टाचार्य, अभिलाषा सिंग, विनोद शारावत, मृदूल शर्मा, अनुराग अरोरा, सिद्धार्थ भारद्वाज यासारखे कलाकार आहेत. 

टॅग्स :नेटफ्लिक्स