Death Anniversary : ‘ही’ होती स्मिता पाटील यांची अखेरची इच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 15:48 IST
निखळ सौंदर्याची खाण असलेली अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज (१३ डिसेंबर) स्मृतीदिन. वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी आजच्याच दिवशी ...
Death Anniversary : ‘ही’ होती स्मिता पाटील यांची अखेरची इच्छा!
निखळ सौंदर्याची खाण असलेली अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज (१३ डिसेंबर) स्मृतीदिन. वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी आजच्याच दिवशी (१३ डिसेंबर १९८६)स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला होता. १७ आॅक्टोबर १९५५ रोजी पुण्यात स्मिता पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या. खरे तर दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून स्मिता पाटील यांच्या करिअरचा प्रवास सुरु झाला. पण श्याम बेनेगल यांनी त्यांच्यातील प्रतिभा हेरली आणि बॉलिवूडच्या एका प्रतिभाशाली अभिनेत्रीचा जन्म झाला. १९७२ साली स्मिता टेलिव्हिजनवर दिसल्या त्यावेळी त्या केवळ १७-१८ वर्षांच्या होत्या. खासगी आयुष्यात स्मिता या प्रचंड बिनधास्त होत्या. दुरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून कामाला असताना त्या जीन्स आणि टीशर्टमध्ये तिथे जात आणि बातम्या देताना जीन्सवरच साडी परिधान करत, असे म्हटले जाते. श्याम बेनेगल यांनी स्मिता यांच्यामधील अभिनय क्षमता ओळखून त्यांना १९७५मध्ये ‘चरणदास चोर’ या चित्रपटात घेतले. या पहिल्याच चित्रपटाने स्मिता पाटील यांना स्टार बनवले.त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. विसाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये आलेल्या स्मिता यांनी ७५ चित्रपट केलेत. निधनानंतर त्यांचे १४ चित्रपट रिलीज झालेत. स्मिता पाटील यांचे खासगी आयुष्य बरेच वादळी राहिले. अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत असताना स्मिता यांना अनेकांचा रोष सहन करावा लागला. त्यावेळी राज बब्बर विवाहित होते. त्यांना दोन मुले होती. विवाहित राज बब्बर स्मिताच्या प्रेमात आकंठ बुडाले. स्मिताही त्यांच्यासोबत राहू लागल्या. पण खुद्द स्मिताच्या आईला तिचे हे रिलेशन मान्य नप्हते. पण आईचे एक न ऐकता स्मिता यांनी राज यांच्यासोबत विवाह केला. मीडियाने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ‘स्त्रीवादी’ स्मिता पाटील यांना घर फोडणारी महिला ठरवण्यात आले. सर्व विघ्न पार करून दोघांनी विवाह केला; पण मनावर झालेले घाव परत कधीच भरले गेले नाही. सेटवर नेहमी आनंदी, उत्साही राहणारी स्मिता आता शांत आणि उदास झाली होती. राज बब्बरशी असलेले लग्न मोडून बाहेर पडण्याचाही त्यांचा विचार होता. पण नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. १३ डिसेंबर १९८६ रोजी राज व स्मिता यांचा मुलगा प्रतिक याचा जन्म झाला. पण प्रतिकच्या जन्मानंतर अवघ्या सहा तासांत स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला. ALSO READ : अशी स्मिता होणे नाही ! मृत्यूनंतर माझा मृतदेह एखाद्या विवाहित महिलेप्रमाणे सजवला जावा, अशी स्मिता यांची इच्छा होती.त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा मृतदेह तीन दिवस बर्फात ठेवण्यात आला होता. कारण स्मिता यांची बहीण अमेरिकेमध्ये राहत होती. स्मिता यांच्यावर अत्यंसंस्काराची वेळ आली आणि त्यांची अखेरची इच्छा पूर्ण केली गेली. त्यांचे व्यावसायिक मेकअपमन दीपक सावंत यांनी त्यांच्या मृतदेहाचा विवाहित महिलेप्रमाणे मेकअप केला.