आर्म्स अॅक्टप्रकरणी सलमान खानला हजर राहण्याचे न्यायालयाने दिले आदेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 20:24 IST
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याला आर्म्स अॅक्ट (अवैद्य शस्त्रास्त्रे) प्रकरणात जरी न्यायालयाने निर्दोष सोडले असले तरी, तो पूर्णत: ...
आर्म्स अॅक्टप्रकरणी सलमान खानला हजर राहण्याचे न्यायालयाने दिले आदेश!
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याला आर्म्स अॅक्ट (अवैद्य शस्त्रास्त्रे) प्रकरणात जरी न्यायालयाने निर्दोष सोडले असले तरी, तो पूर्णत: या प्रकरणातून बाहेर पडलेला नाही. कारण सलमानला या प्रकरणी न्यायालयाने उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. जोधपूर जिल्हा तथा सत्र न्यायालयाने राज्य सरकारच्या वतीने सलमानविरोधात अपील केले होते. त्यानंतर न्यायालयाने सलमानला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाधीश भगवानदास अग्रवाल यांनी या प्रकरणी सुनावणी देताना म्हटले की, सलमानला येत्या ६ मे रोजी आर्म्स अॅक्ट प्रकरणी २० हजारांच्या जमानत रकमेसह न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. शुक्रवारी झालेल्या या सुनावणीदरम्यान सलमान न्यायालयात उपस्थित राहू शकला नव्हता. त्याच्या वतीने अॅड. हस्तीमल सारस्वत यांनी न्यायालयाचे कामकाज पाहिले. आर्म्स अॅक्ट प्रकरणात सलमानला निर्दोष सोडल्यानंतर या निर्णयाविरोधात राज्य सरकारच्या वतीने अपील करण्यात आले होते. सलमानने अवैद्यरीत्या शस्त्रास्त्रे बाळगले होते. त्यामुळे त्याला निर्दोष सोडण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे अपीलमध्ये म्हटले होते. १८ वर्षांपूर्वी काळवीट प्रकरणात जोधपूर न्यायालयाने सलमानला निर्दोष सोडले होते. न्यायाधीशांनी अडीच ओळीचा निकाल देताना सलमान निर्दोष असल्याचे स्पष्ट केले होते. १९९८ मध्ये जोधपूर येथे आपल्या ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानविरोधात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हरिणाची शिकार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर त्याला लगेचच अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान २२ सप्टेंबर १९९८ रोजी त्याच्या रूममधून रिव्हाल्वर आणि रायफल हस्तगत केली होती. विशेष म्हणजे या दोन्ही शस्त्रास्त्राच्या परवान्याची तारीख संपलेली होती. वन अधिकारी ललित बोडा यांनी लुणी पोलीस ठाण्यात सलमानविरोधात एफआयआर नोंदविली होती. ज्यामध्ये सलमानने शिकारीसाठी रिव्हाल्वर आणि रायफलचा वापर केल्याचे म्हटले होते. त्यामुळे सलमानच्या विरोधात आर्म्स अॅक्टअंतर्गत ३/२५ व २५ कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.