Join us

'बॅटल ऑफ गलवान'मध्ये सलमान खानसोबत दिसणार चित्रांगदा सिंह; म्हणाली, "हा सिनेमा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:54 IST

या सिनेमाबद्दल आणि सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करण्याबाबत तिने नुकतंच मुलाखतीतून भाष्य केलं.

सलमान खान आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमात दिसणार आहे. गलवान खोऱ्यात भारत विरुद्ध चीनमध्ये झालेल्या संघर्षावर सिनेमा आधारित आहे. या सिनेमासाठी सलमान कमालीची मेहनत घेत आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे. लडाखमध्ये मायनस डिग्री तापमानात १५ दिवस तो शूटही करणार आहे. यासाठी त्याने शरिरावर तेवढी मेहनत घेतली आहे. दरम्यान सिनेमात सलमानची हिरोईन म्हणून चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) पहिल्यांदाच दिसणार आहे. या सिनेमाबद्दल आणि सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करण्याबाबत तिने नुकतंच मुलाखतीतून भाष्य केलं.

एका मुलाखतीत चित्रांगदा सिंह म्हणाली, "ही धैर्य आणि साहसाची कथा आहे. मी स्वत: आर्मी कुटुंबातून आली असल्याने या युद्धाबद्दल मीही तेव्हा खूप ऐकलं होतं. त्यामुळे या सिनेमाचा भाग होणं हे माझ्यासाठी खूप पर्सनल आहे. तसंच हा बिग स्केल सिनेमा आणि या मागचा उद्देश हेही माझ्यासाठी खास आहे. त्यात यामध्ये सलमान खान आहे म्हटल्यावर आतापासूनच सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण मी या कथेशी भावनिकरित्या जोडले गेले आहे. म्हणूनच मी सिनेमाला होकार दिला."

ती पुढे म्हणाली, "हा सिनेमा म्हणजे फक्त देखावा नाही तर अर्थपूर्ण आहे. जमिनीशी जोडून ठेवणारा आहे. खरा आहे." हे सांगताना चित्रांगदाच्या आवाजात देशाप्रती गर्वाची भावना दाटून आली होती. या भूमिकेपलीकडे ती या सिनेमाशी जोडली गेली आहे. हा सिनेमा म्हणजे आपल्या खऱ्या हिरोंना सम्मानित करणारा आहे. न ऐकलेल्या गोष्टी सांगणारा आहे.

सलमान खानबद्दल ती म्हणाली,"सलमान ज्या गोष्टीचा भाग होतो ती गोष्ट भव्य होते. तुम्ही अभिनेता असाल किंवा टेक्निशियन, सगळ्याचंच वजन वाढतं. तसंच ही गोष्ट सांगण्याची गरज आहे आणि मी या सिनेमाचा भाग आहे याचा मला आनंद आहे."

टॅग्स :चित्रांगदा सिंगसलमान खानबॉलिवूड