सिनेविश्वातील मानाचा मानला जाणारा कान्स चित्रपट महोत्सव १३ मे पासून सुरू झाला आहे. हा ७८ वा कान्स चित्रपट महोत्सव येत्या २४ मे २०२५ पर्यंत चालणार आहे. यंदाच्या महोत्सवात, ऐश्वर्या राय, जान्हवी कपूर, शर्मिला टागोर, करण जोहर आणि ईशान खट्टर यांसारख्या सेलिब्रिटींचा रेड कार्पेटवर जलवा पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे यावेळी ५ भारतीय चित्रपट कान्समध्ये दाखवण्यात येणार आहेत.
कान्स हा जगातील सर्वात मोठ्या आणि आदरणीय चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे जिथे सेलिब्रिटी, चित्रपट उद्योगातील लोक, विद्यार्थी आणि चित्रपट प्रेमी एकत्र येतात आणि चित्रपटाचा उत्सव साजरा करतात. गेल्या अनेक वर्षांपासून, हा महोत्सव ग्लॅमर, प्रतिष्ठा आणि उत्तम सिनेमाचे प्रतीक आहे. यंदा या महोत्सवामध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर एक नजर टाकूया..
होमबाउंड (Homebound in Cannes)'मसान' फेम नीरज घेवन यांचा दुसरा चित्रपट 'होमबाउंड' दाखवला जाणार आहे. हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 'अन सर्टेन रिगार्ड' विभागासाठी निवडला गेला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा मुख्य भूमिकेत असून, करण जोहरने याची निर्मिती केली आहे.
'अरनयेर दिन रात्रि' (Aranyer Din Ratri in Cannes )सत्यजित रे दिग्दर्शित ‘'अरनयेर दिन रात्रि' या बंगाली क्लासिक चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर यावर्षी कान्समध्ये होणार आहे. या चित्रपटात शर्मिला टागोर, सिमी ग्रेवाल, अपर्णा सेन, सौमित्र चॅटर्जी आणि शुभेंदू चॅटर्जी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.
तन्वी द ग्रेट (Tanvi The Great in Cannes)अनुपम खेर दिग्दर्शित आणि शुभांगी दत्त हिचा डेब्यू 'तन्वी द ग्रेट' या चित्रपटाचा प्रीमियर यंदा कान्समध्ये होणार आहे. या चित्रपटात बोमन इराणी, जॅकी श्रॉफ, अरविंद स्वामी, पल्लवी जोशी आणि 'गेम ऑफ थ्रोन्स' फेम इयान ग्लेन यांच्या भूमिका आहेत. अनुपम खेर यांनी २००२ मध्ये दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट 'ओम जय जगदीश' बनवला. आता २३ वर्षांनी ते 'तन्वी द ग्रेट' घेऊन आले आहेत.
अ डॉल मेड ऑफ क्ले (A Doll Made Up Of Clay in Cannes)सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला 'अ डॉल मेड ऑफ क्ले' हा लघुपट 'La Cinef' विभागात निवडला गेला आहे. ही कथा एका नायजेरियन फुटबॉलपटूभोवती फिरते, जो भारतात फुटबॉलमध्ये करिअर करू इच्छितो.
चरक (Charak in Cannes)
'चरक' हा चित्रपट यावेळी कान्समध्ये दाखवला जाणार आहे. याचे दिग्दर्शन शीलादित्य मौलिक यांनी केले आहे. हा चित्रपट बंगालमधील पारंपरिक चरक पूजेतील अंधश्रद्धांवर प्रकाश टाकतो.