मराठी कॉलिंग ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 12:40 IST
आमची मुंबई गर्ल... जिनं आपल्या अभिनयानं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत धुमाकूळ घातलाय.. बॉलीवुडची तिची एंट्रीही तितक्याच दणक्यात झाली.. बॉलीवुडचे दिग्गज अजय ...
मराठी कॉलिंग ?
आमची मुंबई गर्ल... जिनं आपल्या अभिनयानं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत धुमाकूळ घातलाय.. बॉलीवुडची तिची एंट्रीही तितक्याच दणक्यात झाली.. बॉलीवुडचे दिग्गज अजय देवगण, अक्षय कुमार यांच्यासह सुरुवातीचे सिनेमा करण्याची संधी तिला मिळाली. त्या संधीचं सोनं करत तिनं बॉलीवुडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली. ती अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल. काजलचा 'दो लफ्जों की कहानी' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. या निमित्ताने तिच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद..1. दाक्षिणात्य सिनेमा तू करतेस, बॉलीवुडमध्येही तुझी वेगळी ओळख निर्माण केलीय. मात्र यापैकी तुझं मन जास्त कुठे रमतं ? तुला कुठे काम करायला आवडतं.. ?मी एक पंजाबी मुलगी आहे. माझा जन्म आणि आजवरील जीवन मुंबईत गेलंय. मी दक्षिण मुंबईत राहते. त्यामुळं हिंदी माझ्यासाठी काही नवीन नाही. त्याच वातावरणात वाढली असल्यामुळं हिंदीवर पकड होती. मात्र करियरच्या सुरुवातीलाच दाक्षिणात्य सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळं वेगळी भाषा आणि नवं आव्हान होतं.. त्यावेळी दक्षिणेकडील रसिकांना ते आवडलं.. मला जास्त यश तिथं दाक्षिणात्य सिनेमाला कायमच मनात अढळ स्थान आहे.. मात्र माझ्या दृष्टीने दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि हिंदी सिनेसृष्टीत काहीही फरक नाही. दोन्हीकडे त्याच पद्धतीने काम चालतं. तेच प्रोफेशनलिझम असतं.2. प्रादेशिक भाषेतील सिनेमा, फॅन्स याचा कितपत प्रभाव असतो असं तुला वाटतं ?मला वाटतं नाही की भाषेचा सिनेमावर काही परिणाम होतो.. तुमच्या कथेत किती दम आहे ते अधिक महत्त्वाचं असतं. कारण ती कथा ज्यारितीने मांडलीय त्यावर रसिक सिनेमागृहाकडे आकर्षित होतात.. फॅन्सना जे आवडतं त्याला ते भरभरुन दाद देतात.. तुमचं काम आवडलं की ते तुम्हाला डोक्यावर घेतात.. त्यामुळं सिनेमा हिंदी असो तमिळ असो किंवा अन्य कोणत्याही भाषेतला त्याची कथा आणि सादरीकरण महत्त्वाचं असतं. आता मराठी सिनेमाच पाहा कशी कामगिरी करतायत. एकाहून एक सरस सिनेमा मराठीत बनतायत. त्यामुळं प्रादेशिक भाषा आणि इतर गोष्टीचा फार प्रभाव पडत नाही.3. मराठी सिनेमाचा तू उल्लेख केलास. तर तुला मराठीत काम करायला आवडेल का आणि कोणता मराठी सिनेमा तू पाहिला आहेस ?मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतायत. दर्जेदार विषय येतायत.. अशीच एखादी चांगली स्क्रीप्ट मला मिळाली तर मलाही मराठीत काम करायला नक्की आवडेल.. मला नेहमीच आव्हानात्मक गोष्टी आवडतात.. माझ्यात दडलेल्या अभिनय कलेला वाव देणारी कथा आली तर मी नक्कीच ती मराठी सिनेमातील भूमिकेचा आनंदाने स्वीकार करेन. मी मराठीत नटरंग सिनेमा पाहिलाय. त्या सिनेमाची कथा, त्याचं सादरीकरण, अतुल कुलकर्णी यांचा अभिनय सारं काही थक्क करणारं असंच होतं..4.आता तुझ्या दो लफ्जो की कहानी या आगामी सिनेमाविषयी.. सिनेमाची कथा ऐकल्यावर पहिली प्रतिक्रिया काय होती ?सिनेमाची कथा ऐकून मी तिच्या प्रेमातच पडले. दिपक तिजोरी यांनी जेव्हा ती कथा ऐकवली तेव्हा त्यामधील कल्पकता आणि वेगळेपण मला भावलं. ती भूमिका खरंच आव्हानात्मक असल्याचं मला वाटलं. यातून माझ्या अभिनय कौशल्याला नवा वाव मिळणार होता. या भूमिकेत कोणताही नाटकीपणा नसून मी जशी आहे तशी मला दाखवायचं होतं. त्यात पहिल्यांदाच माझ्या कारकिर्दीत मला अंध तरुणीची भूमिका साकारायची होती. ते मला खूप आव्हानात्मक वाटलं. त्यामुळं लगेच मी सिनेमाला होकार दिला.5. अंध मुलीची व्यक्तीरेखा साकारायची म्हटल्यावर काही विशेष तयारी करावी लागली ? पहिल्यांदाच अशी भूमिका साकारत असल्यानं त्यासाठी विशेष तयारी करावीच लागली. त्यासाठी अंध व्यक्तींचं राहणं, त्यांच्यासारखं वागणं खरंच खूप आव्हानात्मक होतं. त्यांचं आयुष्य जवळून अनुभवण्यासाठी मी काही अंधांच्या संस्थेला भेट दिली. ब्रेल लिपीची माहिती घेत ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.. अंध व्यक्तींसाठी त्यांच्या खास गोष्टी असतात हे मला त्यावेळी कळलं. त्यांच्यासाठी फोन खास वेगळ्या स्टाईलचे असतात, टाईपरायटर आणि मायक्रोवेव्ह मशिनसुद्धा थोडी वेगळी असते हे पाहिलं. त्यांची चालण्याचीही एक पद्धत असते. ते नेहमी उजव्या हाताने दुस-या व्यक्तीचा हात धरतात किंवा काठी पकडतात जेणेकरुन इकडे तिकडे फिरणं सुलभ होईल. त्याच्या जीवनातील बारीकसारीक गोष्टींना जवळून पाहत त्या भूमिकेत आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे.6. अंध व्यक्तींसह वेळ घालण्याची संधी मिळाली, तुला काय शिकायला मिळालं ?त्यांच्याकडून बरंच काही शिकले.. ते खूप आनंदी असतात. आपण जगापासून काही तरी वेगळे आहोत असे ते स्वतःला समजत नाहीत. इतरांनीही त्यांना कमी लेखलेलं त्यांना आवडत नाही. आम्ही तुमच्यासारखेच आहोत, तुमच्यामधले आहोत असं दाखवणं त्यांना खूप आवडतं. त्यांच्याकडून बरीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली तसंच जगण्याचा नवा दृष्टीकोन अनुभवता आला..7. रणदीप हुड्डासोबत तुझ्या केमिस्ट्रीची बरीच चर्चा सुरु आहे. विशेषतः तुझ्या पहिल्या हॉट लिपलॉकची सोशल मीडियावर चर्चा... तर त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता.रणदीप एक प्रचंड हुशार आणि अभिनयाची उत्तम जाण असलेला कलाकार आहे. अभिनय कौशल्याचा पॉवरहाऊस असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. भूमिकेत जीव ओतून काम करणारा तो कलाकार आहे. त्याच्याकडून मी बरंच काही शिकले. शूटिंगच्या वेळी दोघांनी बरीच धम्माल केली. रोमँटिक सीन करण्याआधी तर आम्ही भांडायचो. ज्यामुळं सा-या क्रूची धांदल उडायची.. मात्र रणदीप खरोखर उत्तम कलाकार आहे. सरबजीतमध्येही त्यानं दमदार भूमिका साकारलीय. ती भूमिका पाहून मी निशब्दच झालीय.