बॉक्सआॅफिसवर ‘ट्यूबलाईट’ डिम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 16:05 IST
सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ बॉक्सआॅफिसवर फार उजेड पाडू शकलाच नाही. होय, ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमानच्या या चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा ...
बॉक्सआॅफिसवर ‘ट्यूबलाईट’ डिम!
सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ बॉक्सआॅफिसवर फार उजेड पाडू शकलाच नाही. होय, ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमानच्या या चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा होत्या. पण प्रत्यक्षात ‘ट्यूबलाईट’ डिम ठरतोय. ‘ट्यूबलाईट’ बॉक्सआॅफिसवर फार कमाई करू शकला नाही. ईद शिवाय शनिवार, रविवारी या वीकेंडमुळे ‘ट्यूबलाईट’ चांगली कमाई करेल, असा अंदाज होता. पण हा अंदाज फसलाच.‘ट्यूबलाईट’ने शुक्रवारी २१.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. शनिवारी सिनेमाची कमाई २१.१७ कोटी होती. तर रविवारी सिनेमाला जवळपास २२ कोटी कमावता आले. त्यामुळे सलमानच्या ‘ट्यूबलाईट’ने तीन दिवसात सुमारे ६४ कोटी कमावले. प्रत्यक्षात या सिनेमाकडून यापेक्षा कितीतरी जास्त अपेक्षा होत्या. इतक्या की,‘ट्यूबलाईट’ कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली2’ला मागे टाकेल असेही ठोकताळे बांधले जात होते. पण चित्र वेगळेच आहे. ‘ट्यूबलाईट’ हा कमाईच्या बाबतीत बाहुबलीच्या जवळपासही नसल्याचे दिसतेय. ‘बाहुबली 2’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्याच आठवड्यात १२८ कोटी रुपये कमावले होते. अलीकडच्या काळात ‘प्रेम रतन धन पायो’ हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सलमान खानचा सिनेमा होता. या सिनेमाने पहिल्या दिवशी ४०.३५ कोटी कमावले होते. तर पुढचा सिनेमा ‘सुलतान’ने पहिल्या दिवशी ३६.५४ कोटींची कमाई केली होती. त्यातुलनेत ‘ट्यूबलाईट’ माघारला आहे. सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ एकूण ५४०० थिएटरमध्ये प्रदर्शित झालाय. भारताबाहेर सुमारे १००० थिएटर तर भारतात ४४०० स्क्रीन्स मिळाल्या होत्या. मात्र समीक्षकांनी आणि चाहत्यांनी या सिनेमाला नापसंती दर्शवल्याचे आता तरी दिसून येत आहे.