Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सनातन धर्माचा प्रचार करतोस पण तुझे विचार...", बॉलिवूड गायकाने रद्द केला रणवीरचा पॉडकास्ट, युट्यूबरला चांगलंच सुनावलं

By कोमल खांबे | Updated: February 11, 2025 10:47 IST

'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यानंतर रणवीरविरोधात तक्रार तर करण्यात आली आहे. मात्र यामुळे रणवीरच्या पॉडकास्टवरही परिणाम होणार असल्याचं दिसत आहे. प्रसिद्ध गायकाने त्याच्या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे.

Ranveer Allahbadia : 'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये कुटुंबाविषयी अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वच स्तरातून यूट्यूबर रणवीर अलाहाबादियावर टीका होत आहे. या प्रकरणी समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या या वक्तव्यानंतर प्रेक्षकांची माफीदेखील मागितली आहे. मात्र, शोमध्ये पालकांबद्दल केलेलं हे वक्तव्य रणवीरला महागात पडलं आहे. 

'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यानंतर रणवीरविरोधात तक्रार तर करण्यात आली आहे. मात्र यामुळे रणवीरच्या पॉडकास्टवरही परिणाम होणार असल्याचं दिसत आहे. प्रसिद्ध गायकाने त्याच्या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे. रणवीर अलाहाबादियाचं 'द रणवीर शो' नावाचं पॉडकास्ट आहे. त्याच्या या पॉडकास्टमध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेतेही हजेरी लावतात. रणवीरच्या या पॉडकास्टमध्ये प्रसिद्ध गायक बी प्राकही सहभागी होणार होता. मात्र रणवीरच्या या वक्तव्यानंतर बी प्राकने त्याच्या पॉडकास्टमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

"मी बीअर बायसेप्सच्या पॉडकास्टमध्ये जाणार होतो. पण, मी ते रद्द केलं आहे. कारण, तुम्हाला माहीतच आहे की त्याचे विचार कसे आहेत. आणि त्याने समय रैनाच्या शोमध्ये कसे शब्द वापरले हेदेखील तुम्हाला माहीतच आहे. ही आपली संस्कृती नाही. तुम्ही तुमच्या पालकांबद्दल काय बोलत आहात...कोणत्या गोष्टींबद्दल बोलत आहात, कशाप्रकारे बोलत आहात..ही कॉमेडी आहे का? ही स्टँडअप कॉमेडी नाही. लोकांना शिव्या देणं, त्यांना शिव्या शिकवणं...ही कोणती जनरेशन आहे, हे मला समजत नाही. सरदारजींना मी विचारू इच्छितो की तुम्ही एक सीख आहात. तुम्हाला हे शोभतं का? तुम्ही लोकांना काय शिकवत आहात? ते लोकांना सांगतात की आम्ही शिव्या देतो आणि यात काय चुकीचं आहे? रणवीर अलाहाबादिया तू सनातन धर्माचा प्रचार करतोस, अध्यात्माच्या गोष्टी करतोस. एवढे मोठे लोक तुझ्या पॉडकास्टमध्ये येतात. मोठे संत येतात. तुझे विचार एवढे छोटे आहेत का? जर आपण या गोष्टींना आता थांबवलं नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य हे वाईट असेल. माझी समय रैनाला आणि सगळ्या कॉमेडियन्सना एकच विनंती आहे की प्लीज असं करू नका", असं बी प्राकने म्हटलं आहे. 

रणवीर अलाहाबादियाने मागितली माफी! 

"माझे विधान केवळ अयोग्यच नव्हते तर ते मजेदारही नव्हते. कॉमेडी ही माझी खासियत नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे.  जे घडले त्यामागे मी कोणताही संदर्भ किंवा तर्क देणार नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. वैयक्तिकरित्या माझ्याकडून निर्णय घेण्यात चूक झाली. पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक ऐकतात. त्यामुळे ही जबाबदारी हलक्यात घेईल अशी व्यक्ती मला व्हायचं नाही.  कुटुंब ही शेवटची गोष्ट आहे ज्याचा मला कधीही अनादर करायचा नाही. मला या प्लॅटफॉर्मचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्याची गरज आहे, या संपूर्ण अनुभवातून मी हेच शिकलो आहे. मी आणखी चांगले होण्याचे वचन देतो. मी व्हिडिओच्या निर्मात्यांना व्हिडिओमधून असंवेदनशील भाग काढून टाकण्यास सांगितले आहे आणि शेवटी मी एवढेच म्हणू शकतो की मला माफ करा, मला आशा आहे की तुम्ही एक माणूस म्हणून मला माफ कराल".  

टॅग्स :सेलिब्रिटीयु ट्यूब