सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत बॉलिवूडच्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. चित्रपट, जाहिरातींमधून हे कलाकार करोडोंची माया कमावतात. लक्झरी गाड्या, प्रायव्हेट जेट्स आणि आलिशान बंगले असं लक्झरी आयुष्य जगतात. यात विशेष गोष्ट म्हणजे काही कलाकार हे तर थेट खाजगी बेटाचे मालक आहेत. या यादीत बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचा समावेश आहे.
सुंदर आणि ग्लॅमरस जॅकलिन फर्नांडिस ही एकमेव बॉलिवूड स्टार आहे, जिने स्वतःचे खाजगी बेट विकत घेतले आहे. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील चार एकरांचे हे बेट २०१२ साली तिने खरेदी केले होते. यासाठी तिने सुमारे ६००,००० अमेरिकन डॉलर्स (३ कोटी रुपये) मोजले होते. हे बेट श्रीलंकेच्या एका उच्चभ्रू क्षेत्रात असून माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराच्या बेटाजवळच आहे.
जॅकलिनचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास
श्रीलंकेत जन्मलेली जॅकलिन फर्नांडिसची २००६ मध्ये मिस श्रीलंका युनिव्हर्स म्हणून निवड झाली आणि त्यानंतर २००९ मध्ये 'अलादीन' चित्रपटासाठी ऑडिशन दिल्यानंतर तिचं सिलेक्शन झालं. या चित्रपटानंतर तिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही. २०११ मध्ये आलेल्या 'मर्डर २' या चित्रपटाने तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर 'हाऊसफुल २', 'रेस २' यांसारख्या यशस्वी चित्रपटांनी तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. जॅकलिन अलिकडेच ती 'फतेह' या सिनेमात झळकली होती. तर लवकरच ती अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल ५' आणि 'वेलकम टू द जंगल' या बहुचर्चित चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे.