Sonam Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही (Sonam Kapoor) इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी आहे. 'सावरियॉं' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन तिने स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली. तिचे 'निरजा', 'रांझणा', 'वीरे दे वेडिंग', 'प्रेम रतन धन पायो' यांसारखे चित्रपट चांगलेच गाजले. मागील काही वर्षांपासून सोनम अभिनयापासून थोडी दुरावली आहे. सोनम कपूर तिचा पूर्ण वेळ तिच्या लाडक्या लेकासोबत घालवत आहे. दरम्यान, सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांनी २०१८ मध्ये लग्न केलं. लग्नापूर्वी हे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या सुखी संसाराला आता ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सोनम कपूरने सोशल मीडियावर तिच्या पतीसोबतचे लग्नातील सुंदर असे अनसीन फोटो शेअर केले आहेत.
नुकतीच सोनम कपूरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पती आनंद अहुजाबरोबरचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिलं, "तुझी तुलना कोणाशीही करू शकत नाही. माझ्या आयुष्यातील प्रेम..., लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...!" असं लिहित अभिनेत्रीने तिच्या मनातील प्रेमभावना व्यक्त केल्या आहेत. सोनम कपूरने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी मंडळींनी कमेंट्सच्या माध्यमातून या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनम आणि आनंदच्या लग्नाची चांगलीच चर्चा त्यावेळी मीडियात रंगली होती. त्यांना एक गोंडस मुलगा देखील आहे. २०१४ मध्ये सोनम आणि आनंदची पहिली नजरानजर झाली होती. दोघांचीही कॉमन फ्रेन्ड परनिया कुरैशी हिला याचे श्रेय जाते. परनिया दोघांचीही चांगली मैत्रीण आहे. परनियाच्या माध्यमातून सोनम व आनंद पहिल्यांदा भेटले.या पहिल्या भेटीच्या महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले आणि इथून या गोड प्रेमकथेची सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं.