आपल्या आवडत्या कलाकारांच्या कुटुंबाबाबत, त्यांच्या लाइफस्टाइलबाबत जाणून घेण्यासाठी अनेक चाहते उत्सुक असतात. मागील काही दिवसांपासून सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो ट्रेंडमध्ये आहेत. अनेक सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहतेही आपल्या आवडत्या कलाकाराचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या अशाच एका अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या चिमुकल्याचं बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी खास कनेक्शन आहे. तसेच हा चिमुकला आज बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीचा पती आहे.
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण सलमानच्या कडेवर बसलेला हा लहानगा आजचा प्रसिद्ध अभिनेता आहे. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नाही तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा पती आणि अभिनेता जहीर इक्बाल आहे. जहीर हा अभिनेता असून त्याने 'नोटबुक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.सलमान आणि जहीर यांचे खूप जवळचे नातेसंबंध आहेत. जहीर लहान असतानापासूनच सलमानच्या कुटुंबासोबत त्याचे घनिष्ठ संबंध आहेत. सलमानने केवळ जहीरला लाँच केलं नाही, तर त्याच्या करिअरमध्येही साथ दिली आहे.
आज जहीर इक्बाल दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा जावई म्हणूनही ओळखला जातो. जहीरचं बॉलिवूडमधील करिअर म्हणावं तेवढं यशस्वी झालं नसलं, तरी तो कोटींचा मालक आहे. जहीरच्या कुटुंबीयांचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. इक्बाल रतन्सी यांचा तो मुलगा आहे. इक्बाल हे अभिनेता सलमान खानचे खास मित्र आहेत. खरं तरं सोनाक्षी आणि जहीर यांची भेटही सलमानेच घडवून आणली होती. सोनाक्षी आणि जहीरने २०१७ मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. दोघे २०२२ मध्ये 'डबल एक्सएल' चित्रपटात दिसले होते. त्यांनी २३ जून २०१४ रोजी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं होतं. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.