बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. 'नागिन'सारख्या मालिकेतून मौनी रॉयने टेलिव्हिजन इंडस्ट्रीही चांगलीच गाजवली. मौनी रॉयने (mouni roy) 'ब्रम्हास्त्र' सिनेमात रणबीर कपूर, आलिया भटसोबत अभिनय करुन चांगलाच भाव खाल्ला. मौनी रॉयच्या 'भूतनी' या नव्या सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मौनी रॉय विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. त्यानिमित्ताने मौनीने तिच्या आयुष्यात घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. जेव्हा रात्री उशीरा एक अज्ञात व्यक्ती तिच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा काय घडलं?
मौनी रॉयने सांगितला धक्कादायक प्रसंग
मौनी रॉयने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मी कामानिमित्त एका छोट्या शहरात राहत होती. मला त्या भागाचं नाव आता आठवत नाहीये. परंतु ज्या खोलीत मी राहत होती, त्या रुमची चावी एका अज्ञात व्यक्तीने चोरली. पुढे त्या व्यक्तीने माझ्या रुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मी रुममध्ये एकटी नव्हते. माझा मॅनेजर माझ्यासोबत होता. जेव्हा आम्हाला कळलं की, कोणीतरी दरवाजा उघडतंय तेव्हा आम्ही जोरात ओरडायला लागलो. "
अभिनेत्री पुढे म्हणाली, "त्यानंतर आम्ही रिसेप्शनिस्टला फोन केला. त्यावेळी त्यांनी हाउसकीपिंग करणारा कोणी व्यक्ती असेल, असं सहज उत्तर दिलं. हाउसकीपिंग करणारा व्यक्ती दार न वाजवता, बेल न वाजवता, रात्री १२.३० वाजता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न का करेल? असा प्रश्न मी त्यांना विचारला. माझ्या तक्रारीनंतर त्यांनी या घटनेला गांभीर्याने घेतलं आणि हॉटेल व्यवस्थापनाला धारेवर धरलं. " मौनी रॉयची प्रमुख भूमिका असलेला 'भूतनी' हा सिनेमा १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे.