Join us

"लोकांची नजर लागते...", अभिनेत्री अमृता रावचा इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:40 IST

"लोकांची नजर लागते...", 'जॉली एल एल बी ३' फेम अमृता रावचा इंडस्ट्रीतील राजकारणाबद्दल खुलासा

Amrita Rao:बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून अमृता राव (Amrita Rao) ओळखली जाते. आपल्या सुंदर अभिनयानं अमृतानं प्रेक्षकांची मनं जिंकली. 'अब के बरस' चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या या नायिकेला 'मैं हू ना' या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. 'विवाह','मैं हूं ना', तसेच 'ईश्क विश्क','मस्ती' या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. मात्र, बऱ्याच काळापासून ही अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून दुरावली होती. आता 'जॉली एल एल बी ३' चित्रपटातून अमृता रावने दमदार कमबॅक केलं आहे. तिच्या कामाची सगळीकडे चर्चा होत आहे. अशातच या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत  अमृताने बॉलिवूड इंडस्ट्रीतील राजकारणाबद्दल भाष्य केलं आहे. 

सध्या अभिनेत्री अमृता राव 'जॉली एल एल बी ३' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. याच दरम्यान तिने युट्यूबर रणबीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने बॉलिवूडमधील राजकारणाविषयी भाष्य करत आपलं मत मांडलं. त्यावेळी ती म्हणाली,"मी इंडस्ट्रीत कोणत्याही गॉडफादरशिवाय आले आणि एकामागोमाग तीन सुपरहिट सिनेमे दिले. यातच मी आनंदी होते. पण, काही गोष्टींमुळे मला असंही वाटत होतं की हे माझ्यासोबतच का बरं घडतंय? "

अमृता राव काय म्हणाली?

त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली, "जर तुम्ही लोकांच्या नजरेत आला तर सगळीकडे तुमच्याबद्दल चर्चा होताना दिसते. अरे ही कोण आहे? असे प्रश्न देखील उपस्थित केले जातात. लोकांची नजर लागते. काहींना वाटेल की मी वाट्टेल ते बोलतेय पण हे खरं आहे. मला याचा अनुभव आला आहे. मला त्रास होत असल्याने एकदा माझ्या कामवाल्या बाईने माझी नजर काढली होती त्यानंतर मला बरं वाटलं."

इंडस्ट्रीतील राजकारणाबद्दल बोलताना अमृता रावचा धक्कादायक खुलासा 

इंडस्ट्रीतील पॉलिटिक्सबद्दल बोलताना अमृता म्हणाली, "राजकारण सगळीकडेच आहे. ईश्क विश्क रिलीज झाला त्यावेळी मी आणि शाहिद दोघेही स्टार होतो. त्यावेळी आम्ही एका पुरस्कार सोहळ्यासाठी फोटोशूट केलं होतं. परंतु जेव्हा मी त्याचं कव्हरशूट पाहिलं त्यात ते खरे फोटो नव्हतेच. माझ्याजागी दोन सुपरस्टार होते आणि कुठेतरी मागे उभी आहे, असं त्यात दाखवण्यात आलं होतं. सुरुवातीला मला या गोष्टींचा त्रास व्हायचा पण आता मी त्याकडे दुर्लक्ष करते." असा खुलासा करत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.    

टॅग्स :अमृता रावबॉलिवूडसेलिब्रिटीअक्षय कुमारअर्शद वारसी