Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला आॅफर केली होती, ‘बाहुबली’मधील शिवगामीची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 22:13 IST

अभिनेते धर्मेंद्र आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘शोले’ या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अशाच काहीशा इतिहासाची ...

अभिनेते धर्मेंद्र आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘शोले’ या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अशाच काहीशा इतिहासाची पुनरावृत्ती ‘बाहुबली-२’ने केली आहे. कारण या चित्रपटातील प्रत्येक पात्र रातोरात सुपरडूपर हिट झाले असून, त्यांची चित्रपटातील नावे प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. यातील एक भूमिका बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला आॅफर करण्यात आली होती, मात्र काही कारणामुळे योग जुळून न आल्याने त्या अभिनेत्रीला या सुपरहिट चित्रपटापासून दूर राहावे लागले.  होय, बॉलिवूडमध्ये एकेकाळी सर्वोच्च स्थानावर असलेल्या अभिनेत्री श्रीदेवीला ही भूमिका आॅफर करण्यात आली होती; मात्र काही कारणामुळे तिला ही भूमिका साकारता आली नाही. आता तुम्ही विचार करीत असाल की, अशी कोणती भूमिका होती, जी श्रीदेवी करणार होती. होय, तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. श्रीदेवी चित्रपटातील प्रमुख भूमिका असलेल्या राजमाता शिवगामीची भूमिका साकारणार होती. जेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी श्रीदेवीला या भूमिकेसाठी विचारणा केली तेव्हा सगळे योग जुळून आले होते; मात्र पैशांवरून बोलणी फिस्कटली. वास्तविक श्रीदेवीला ही भूमिका आणि चित्रपटाची कथा आवडली होती. या भूमिकेसाठी श्रीदेवीने भारीभक्कम पैशांची मागणी केल्याने, राजामौली यांना श्रीदेवीचा विचार मनातून काढावा लागला. कारण श्रीदेवीने केलेल्या पैशांची मागणी चित्रपटाच्या बजेटबाहेर होती.श्रीदेवीने नकार देताच ही भूमिका साउथ अभिनेत्री राम्या कृष्णन्न हिला देण्यात आली. पुढे श्रीदेवीने ‘बाहुबली’ऐवजी ‘पुली मूवी’ हा साउथ चित्रपट साइन केला. मात्र हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नाही. आता तुम्हीच विचार करा की, जर श्रीदेवीला ही भूमिका आॅफर केली गेली असती तर तिचा काय रुबाब असता. असो, जे होत असते... ते चांगल्यासाठीच होत असते. कारण चित्रपटाचे आकडे रेकॉर्डब्रेक असून, शिवगामीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावत आहे.