Join us

लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:12 IST

बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री आलिया भटने लग्नाच्या तीन वर्षांनंतर नावात मोठा बदल केला आहे. एक फोटो व्हायरल झाल्याने या चर्चांना उधाण आलंय

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (alia bhat) तिच्या सिनेमांमुळे चांगलीच चर्चेत असते. सुरुवातीला अभिनय आणि जनरल नॉलेज यामुळे आलिया भटला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. परंतु नंतर उत्कृष्ट अभिनयाचं दर्शन घडवत आलियाने विविध सिनेमांमधून चांगलं काम केलं. सध्या आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी कारण आहे तिचं नाव. आलिया भट सध्या आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी फ्रान्समध्ये आहे. याचदरम्यान, तिच्या व्लॉगमध्ये एक फोटो दिसून आला. ज्यामध्ये आलियाने तिच्या नावात बदल केल्याचं पाहायला मिळालं.

लग्नाच्या ३ वर्षांनी आलियाने नावात केला बदल?

एका व्लॉगमध्ये आलिया एका फ्रेंच हॉटेलमध्ये दिसली. त्या हॉटेलमध्ये आलियाला ‘आलिया कपूर’ या नावाने संबोधण्यात आलं आहे. यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली की, आलियाने खरंच आपलं आडनाव बदललं आहे का? आलियाने अभिनेता रणबीर कपूरसोबत २०२२ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर दोघांना राहा नावाची एक मुलगीही झाली आहे. लग्नानंतर अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात कपूर आडनाव स्वीकारलं असल्याचं तिने याआधीही स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र मनोरंजन विश्वात ती अजूनही ‘आलिया भट’ याच नावाने ओळखली जात होती.

आता ‘आलिया कपूर’ असं नाव एका फ्रेंच हॉटेलमधील वेलकम लेटरवर झळकले आणि त्याचा फोटो व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली. हा फोटो व्हायरल झाल्यावर आलियाची एक जुनी मुलाखत समोर आली, ज्यात आलियाने सांगितलं होतं की, तिने तिचं नाव ‘आलिया भट-कपूर’ असं करण्याचा विचार केला होता, पण वेळेअभावी ते पूर्ण करता आलं नव्हतं.

यावरून अंदाज लावला जात आहे की, आता कदाचित तिने अधिकृतरित्या 'कपूर'  आडनाव स्वीकारलं असावं. सध्या या चर्चांवर आलियाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आलिया भट अलीकडेच आपल्याला 'जिगरा' सिनेमात दिसून आली. सध्या आलिया रणबीर-विकीसोबत 'लव्ह अँड वॉर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडरणबीर कपूर