Suniel Shetty: अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) हा बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. लवकरच तो 'केसरी वीर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या इंडस्ट्रीत या चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच सुनील शेट्टी आता 'केसरी वीर' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या २३ मे ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याचा मुलगा अहान संदर्भात केलेल्या वक्तव्याने सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत.
सुनील शेट्टी हा उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम वडील देखील आहे. नुकतीच अभिनेत्याने झूम ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, 'बॉर्डर-२' केल्यानंतरही काही लोक अहानच्या करिअरवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी सुनील शेट्टी म्हणाला, "मी अहानला फक्त एकच गोष्ट सांगितली आहे की, तू यापुढे चित्रपटात काम केलंस किंवा नाही केलंस तरी चालेल. पण, या चित्रपटासाठी तू मेहनत घे. कारण, हा असा चित्रपट असेल जो आपल्या व्यक्तिरेखेला कायम जिवंत ठेवेल."
सुनील शेट्टी पुढे म्हणाला, "या चित्रपटासाठी बऱ्याच गोष्टी अहानच्या हातून निसटल्या. त्याला काही चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले आणि नंतर त्याच्यावर आरोप करण्यात आले. त्याच्यासोबत महागडे बॉडीगार्ड असतात, अशा अफवा पसरवल्या गेल्या. तसंच काही चुकीचे आर्टिकल्स देखील पब्लिश करण्यात आले. मी यासंदर्भात कधीच कुठे बोललेलो नाही. पण, अहान बाबतीत चुकीची माहिती पसरवण्यात आली. जर या गोष्टी पुढे अशाच सुरु राहिल्या तर मी पत्रकार परिषद घेईन आणि सत्य उघड करेन. त्यांच्या साधेपणाचा मुखवटा मी सगळ्यांसमोर उतरवणार." असा म्हणत सुनील शेट्टीने लेकाबाबत नकारात्मक माहिती पसरवणाऱ्यांना तंबी दिली आहे.