Akshay Kumar: हिंदी सिनेसृष्टीत अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांनी चाहत्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय असणारी जोडी आहे. २००१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. अनेकवर्षे हे दोघे अगदी सुखाचा संसार करत आहेत. या जोडप्याला दोन मुलं देखील आहेत. अशातच अक्षय कुमारने नुकत्याच एका मुलाखतीत ट्विंकल आणि त्याच्या वैवाहिक जीवनावर भाष्य केलं आहे. सुरुवातीच्या काळात त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी ट्विंकल खन्नाने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती, असं त्याने या मुलाखतीत सांगितलं.
सध्या अक्षय कुमार 'जॉली एलएलबी-३' चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्याने आप की अदालत मध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान, त्याच आणि ट्विंकल खन्नाचं लग्न आमिर खानमुळे झालं असंही स्पष्ट सांगितलं. तो किस्सा शेअर करताना अक्षय कुमार म्हणाली, "जेव्हा ट्विंकल आणि आमिर खान यांचा 'मेला' सिनेमा रिलीज होणार होता. त्याचदरम्यान, आमचं अफेअर सुरु होतं. तेव्हा मी तिला विचारलं की आपण लग्न करूयात का? पण तिला लग्न करायचं नव्हतं. त्यावेळी तिने म्हटलेलं की जर मेला चित्रपट चालला नाहीतर मी लग्न करेन. लोकांना हेच वाटलेलं की या चित्रपटात आमिर खान आहे तर नक्की चालेल. पण प्रत्यक्षात उलट घडलं."
त्यानंतर अक्षय कुमार आमिर खानचा उल्लेख करत म्हणाला, "आमिर खान साहेब माफ करा. तुमचा तो चित्रपट चालला नाही पण तुमच्यामुळे माझं लग्न झालं." याचवेळी पत्नी ट्विंकलचं कौतुक करत अक्षय कुमारने म्हटलं, "ती कायम बेधडकपणे बोलते. पण,तिच्या मनात काही नसतं. जेव्हा आमचं नवीन लग्न झालं त्यावेळी आम्ही जोडीने एका चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी गेलो होतो. तिथे त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिला सहज विचारलं की, चित्रपट तुम्हाला कसा वाटला? त्यावर तिने थेट उत्तर देत चित्रपट चांगला नव्हता असं म्हटलेलं. त्यामुळे आता ते मला त्यांच्या चित्रपटात कधी कास्ट करणार नाही, असं मला वाटतं होतं." असा मजेशीर किस्सा अभिनेत्याने शेअर केला.