Rajat Bedi: हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारा, रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेऊन यशस्वी ठरणाऱ्या अभिनेत्यांमध्ये रजत बेदीचं नाव आघाडीवर आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका गाजली. 'कोई मिल गया',' चालबाज', 'जानी दुश्मन:अनोखी प्रेम कहाणी' तसेच 'रॉकी' यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारून आपल्या अभिनयाची प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडलं. मात्र,त्यानंतर बराच काळ तो इंडस्ट्रीपासून दूर होता. अलिकडेच त्याने बॅड्स ऑफ बॉलिवूडमधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. यादरम्यान,दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्याविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत.
रजत बेदीने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी त्याची कारकीर्द म्हणावी तशी बहरली नाही.नुकतीच त्याने मीड डे ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, अभिनेत्याने त्याच्या मानसिक स्वास्थाविषयी भाष्य करत धक्कादायक खुलासे केले. त्यावेळी मुलाखतीत रत बेदी म्हणाला, "मी अनेक हिट चित्रपटांचा भाग राहिलो आहे. पण त्यासाठी मला माझं मानधन कधीच मिळालं नाही.उलट लोकांना त्यांचं थकलेलं मानधन मिळालं आणि त्यांनी सेलिब्रेशन केलं. पण, मी विचार केला ठीक आहे आणि मग मी पुढच्या प्रोजेक्टकडे वळलो. खरंतर हे सगळं खूप धक्का देणारं होतं. यामुळे मी स्वतःच्या भविष्याचा विचारही करू शकत नव्हतो पाहू शकत नव्हतो.कारण मला जे काम करायचं होतं, त्यासाठी पुरेसं मानधन मिळत नव्हतं. निर्माते मला वेळेवर पैसे द्यायचे नाहीत आणि त्यामुळे माझं नुकसान व्हायचं."
त्यानंतर पुढे रजत बेदी म्हणाला,"एक वेळ अशी आली जेव्हा मला वाटलं की, आता बस झालं. मला नर्व्हस ब्रेकडाउन होत होता.मी गोळ्या घेत होतो. रात्री आरामात झोपण्यासाठी मी झोपेच्या गोळ्या घेऊ लागलो. घर कसं चालवायचं याचा सतत विचार डोक्यात येत असायचा." असा खुलासा रजत बेदीने मुलाखतीमध्ये केला.