कपूर, खान आणि बच्चन कुटुंबांप्रमाणेच देओल कुटुंबानेही भारतीय चित्रपटसृष्टीवर मोठी छाप पाडली आहे. धर्मेंद्र, सनी, बॉबी आणि ईशा देओल यांनी अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. आता देओल कुटुंबातील तिसरी पिढीही चित्रपटसृष्टीत नशीब आजमावत आहे. सनी देओलचा मुलगा करण आणि राजवीर देओल यांच्या कारकिर्दीनंतर आता बॉबी देओलचा (Bobby Deol) मुलगा आर्यमान देओल (Aryaman Deol) लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे.
सध्या 'The Ba***ds of Bollywood' वेब सीरिजमुळे चर्चेत असलेल्या बॉबी देओलने नुकतीच एका मुलाखतीत लेकाबद्दल मोठा खुलासा केला. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत बॉबीने सांगितले की, "आर्यमानला चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याची इच्छा आहे. तो लवकरच इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करू शकतो". बॉबी देओलने स्पष्ट केले की, आर्यमान सध्या अनेक मोठ्या ऑफर्स मिळत आहेत. पण, पूर्ण तयारीशिवाय अभिनेता आपल्या लेकाला इंडस्ट्रीत लॉन्च करणार नाही. बॉबी म्हणाला, "तो काम करत आहे आणि प्रशिक्षण घेत आहे. त्याला अनेक ऑफर येत आहेत. पण, पोहायला शिकल्याशिवाय मी त्याला समुद्राच्या मध्यभागी फेकून देऊ इच्छित नाही".
देओल कुटुंबातील चिराग!
आर्यमान हा सोशल मीडियावर फारसा सक्रीय नाही. आर्यमानला लाइमलाइटमध्ये राहायला फारसं आवडत नाही. अलिकडेच पार पडलेल्या 'The Ba***ds of Bollywood'च्या प्रिमियरमध्ये त्याला वडिलांसोबत पाहिलं गेलं. त्या कार्यक्रमातील त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. देओल कुटुंबाचा हा नवा सदस्य बॉलिवूडमध्ये कधी आणि कोणत्या चित्रपटातून पदार्पण करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तो इतर स्टारकिड्सना चांगलंच आव्हान देईल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.