Join us

‘आता लता दीदी कधीच गाऊ शकणार नाहीत....’; ‘त्या’ अफवेनं हादरले होते चाहते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 08:00 IST

Lata Mangeshkar  : आपल्या दैवी आवाजाने अख्ख्या देशाला मंत्रमुग्ध करणा-या लता दीदी अर्थात लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस....

ठळक मुद्देलता मंगेशकर यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकात पद्मा सचदेव यांनी सुद्धा या विषप्रयोगाचा उल्लेख केला आहे.

आपल्या दैवी आवाजाने अख्ख्या देशाला मंत्रमुग्ध करणा-या लता दीदी अर्थात लता मंगेशकर (Lata Mangeshkar ) यांचा आज वाढदिवस. 25 हजारांहून अधिक गाणी गाणा-या लता मंगेशकर हे भारताला लाभलेलं अनमोल सूररत्न आहे. 1942 साली ‘किती हसाल’ या मराठी सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं आणि पुढे त्यांच्या जादुई आवाजानं जगभरातील संगीतप्रेमींना वेड लावलं. याच लता दीदींवर वयाच्या 33 व्या वर्षी विषप्रयोग झाला होता, यावर विश्वास बसणार नाही. पण खुद्द लता दीदींनी हा खळबळजनक खुलासा केला होता.वयाच्या 33 व्या वर्षी लता दीदींवर विषप्रयोग झाला होता. होय, विष देऊन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता.  ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वत: हा खुलासा केला होता.

मी तीन महिने अंथरूणाला खिळून होते...‘खूप जूनी गोष्ट आहे. माझ्यावर विषप्रयोग झाला होता. आता आमच्या घरात या विषयावर चर्चा होत नाही. कारण तो आमच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक काळ होता. ही 1963 ची घटना आहे. विषप्रयोगानंतर जवळपास तीन महिने मी अंथरूणाला खिळून होते. मी खूप अशक्त झाले होते, मला अंथरुणावरून उठताही येत नव्हते. नीट चालताही येत नव्हते,’ असं त्यांनी सांगितलं होतं.

माझ्याकडे पुरावा नव्हता...विषप्रयोग कुणी केला होता, हे आम्हाला कळलं होतं. पण त्या व्यक्तिविरोधात आम्ही काहीही कारवाई केली नाही. कारण आमच्याकडे पुरावा नव्हता. पण त्यावेळी त्या व्यक्तिच्या त्या वागण्याचं नवल वाटलं होतं, असंही त्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

मी कधीच गाऊ शकणार नाही..., त्या अफवा होत्या...या विषप्रयोगानंतर मी कधीच गाऊ शकणार नाही, असा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. पण त्या अफवा होत्या. एकाही डॉक्टरनं आम्हाला तसं काही सांगितलं नव्हतं. तीन महिने माझं गाणं बंद होतं. मी उठून चालूही शकत नव्हते. मी भविष्यात चालू शकेल नाही, असा एकच विचार त्यावेळी मनात असायचा, असंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं. 

 सकाळी उठल्या अन् हिरव्या रंगाच्या उलट्या सुरू झाल्यात...लता मंगेशकर यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकात पद्मा सचदेव यांनी सुद्धा या विषप्रयोगाचा उल्लेख केला आहे.  ही गोष्ट 1962 सालीची आहे. दीदी 33 वर्षांच्या होत्या. एक दिवशी सकाळी त्या झोपून उठल्या आणि अचनाक त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. थोड्याच वेळात त्यांना हिरव्या रंगाच्या उलट्या सुरु झाला. अचानक  तब्येत एकदम खालावली. उपचारांसाठी डॉक्टरांना बोलवण्यात आले. पुढचे तीन दिवस त्यांची परिस्थिती अशीच राहिली. त्यानंतर हळूहळू 10 दिवसांनी त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. या कठिण प्रसंगी मजरुह सुल्तानपुरी यांनी त्यांची देखरेख केली होती. ऐवढेच नाही तर लता दीदींसाठी बनणारे जेवण आधी स्वत: ते खावून बघायचे. त्यानंतर ते जेवण लता दीदींना दिले जायचे. हे सगळे घडत असताना त्यांचा जेवण बनवणारा आचारी सुद्धा पळून गेला होता.  अनेक शोध घेऊन ही त्या आचा-याचा पत्ता कुठे लागलाच नाही.

टॅग्स :लता मंगेशकर